माणगाव : तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को स्टील कंपनीचे प्रशासन करीत असलेल्या मनमानी व अन्यायाविरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने दखल न घेतल्याने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने चिघळले आहे. या आंदोलनाची दखल तातडीने न घेतल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त आंदोलकांचे नेते मिलिंद फोंडके, प्रसाद गुरव, लक्ष्मण महाळुंगे, आदेश महाडिक, आप्पा महामुणकर, ओमकार समेळ, संदीप जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.स्थानिक व प्रकल्पग्रस्तांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवसाअखेर देखील कंपनी व्यवस्थापनाने अथवा लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. पोस्को प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही लोकप्रतिनिधींच्या छुप्या पाठिंब्यामुळे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करीत स्थानिकांवर अन्याय सुरूच ठेवला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पाला गेल्या आहेत त्यांना रोजगार न देता जाणीवपूर्वक डावलून परप्रांतीयांना नोकरीवर घेतले जाते किंवा कामाचे ठेके दिले जात आहेत. याविरोधात ३ एप्रिलपासून पोस्कोच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाकडे प्रशासन, कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने पंचक्र ोशीतील ग्रामस्थ संतप्त झाले. आंदोलनाची दखल संबंधित यंत्रणांनी तातडीने घेतली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलकांचे मनोबलही वाढले. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार केला.
‘आंदोलनाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण’
By admin | Published: April 07, 2017 2:53 AM