लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. इगतपुरीत अतिवृष्टी झाली, तर पेठ व त्र्यंबकेश्वरला पावसाने झोडपले. शहरातही शनिवारी पहाटेपासून पावसाने मुक्काम ठोकला.शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी रात्रीतून ७० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. शनिवारी पहाटेपासून पावसाने सर्वत्र जोर धरला. इगतपुरी येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५७, सुरगाणा येथे ७४ मिलिमीटर, तर त्र्यंबक येथे १२० मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. खरिपाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. विशेषत: पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यात भाताची आवणी करण्याजोगा पाऊस झाल्याने त्याची तयारी सुरू झाली आहे. नदी, नालेही भरून वाहू लागले आहेत. विदर्भात चंद्रपूर येथे २७ मि.मी. पावसाची नोंद झाली. अकोल्यातही पाऊस झाला. अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूूर येथेही पाऊस झाला. मुळा, भंडारदरा पाणलोटात जोरअहमदनगर : मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात मान्सूनचे दमदार आगमन झाले. शनिवारी रतनवाडी व पांजरे येथे तीन इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात २९५ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा नदी प्रवाही होऊ लागली आहे. हरिश्चंद्र गडाच्या पर्वत रांगात शनिवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. मध्य महाराष्ट्राला प्रतीक्षा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागाला अजूनही पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. अरबी समुद्रात पोषक हवामान तयार होत असल्याने कोकणात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, विदर्भात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
इगतपुरीत अतिवृष्टी; नदी, नाले तुडुंब!
By admin | Published: June 25, 2017 1:46 AM