कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप मिळून राज्यात नवीन सत्ता स्थापन करून शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यामध्ये ज्या उलथापालथी होतात, त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. सध्या आम्ही राज्यातील 16 मतदारसंघामध्ये काम करत आहोत. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आल्यास कोअर कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल. मी जी भूमिका मांडेन ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, शरद पवार आणि नारायण राणे यांनी नेमकं काय वक्तव्य केले, याबद्दल मला काही माहीत नाही. महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, पण आमच्या सगळ्या नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आपण एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे, काही गोष्टी सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीचा पुरेसा आधी आणि पुरेसा नंतर विचार करतो. सकाळी मी हे पेपरमध्ये वाचले की उद्धव ठाकरे यांची एक्झिट आहे म्हणून. पण मला वाटत नाही की कोण आपली इतकी बदनामी करुन घेईल. हा अभ्यासाचा विषय आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. याशिवाय, मोहित कंबोज सगळ्यांचेच मित्र आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे देखील मित्र आहेत. मोहित कंबोज तिकडे गेल्याबद्दल मला काही माहीत नाही. तसेच, संजय राऊत हेच शिवसेना संपवत असल्याचे मी यापूर्वीही बोललो आहे. ते सकाळी एक बोलतात आणि नंतर दुसरे, याचा फटका शिवसेनेलाच बसला असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.