मीरा रोड : पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती असतानाही ती यंत्रणा राबवण्यास मीरा-भार्इंदर महापालिकाच उदासीन आहे. या प्रणालीसाठी महापालिकेने केवळ १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. महापालिका मुख्यालयाव्यतिरिक्त पालिकेने आपल्या अन्य कार्यालयांच्या इमारती, शाळा, स्मशानभूमी, उद्याने आदी १७० ठिकाणी ही यंत्रणा उभारलेली नाही.पावसाने ओढ दिल्याने शहरी व ग्रामीण भागांत यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने शहरातील नागरिकांना विहिरी, कूपनलिका आदी जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. पावसाचे पाणी साठवण्याचा एक पर्याय म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे पाहिले जाते. ही यंत्रणा राबवण्याची सक्तीही करण्यात आली आहे. परंतु, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पालिका व लोकप्रतिनिधी एक कमाईचे साधन म्हणून पाहत आले आहेत.महापालिकेच्या मुख्यालयासह रु ग्णालय, विविध कार्यालयांच्या १५ इमारती आहेत. शाळा, बालवाड्या, अंगणवाड्यांच्या ३८ इमारती आहेत. शहरात पालिकेची तब्बल ६० उद्याने, ११ मैदाने व १४ स्मशानभूमी, तर एक रोपवाटिका आहे. परंतु, महापालिका प्रशासन तेथे रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यास अनुत्सुक आहे. मुख्यालयाच्या इमारतीमधील यंत्रणाही नावापुरतीच आहे. महापालिकेने आपल्या इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या जोडण्या दिल्या आहेत. या इमारतींमधील साफसफाई, स्वच्छतागृह आदींसाठीदेखील पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. उद्याने, मैदानांमध्येही पिण्याचे पाणी वापरले जाते. महापालिकेने आपल्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारल्यास पावसाचे कोट्यवधी लीटर पाणी साठवता येईल. ही यंत्रणा महापालिकेने आधीच राबवली असती तर यंदाच्या वर्षी दिलासा मिळाला असता. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांपुढे एक आदर्श उभा राहिला असता. दरम्यान, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)
रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 16, 2016 3:38 AM