अनिरुद्ध पाटील,
बोर्डी- पश्चिम रेल्वेवरील विरार नंतर आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र, डहाणू रोडनंतरच्या घोलवड तसेच बोर्डी रोड रेल्वे स्थानकांची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना रेल्वे मंत्रालयाने दुजाभाव केल्याची टीका महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नागरिकांनी केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविणाच्या दृष्टीने विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरण हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या पट्यात लोकलच्या जादा फेऱ्या वाढण्यासह आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने एकूण सतरा स्थानके होतील. मात्र, डहाणू रोड नंतरची स्थिती पाहता हे चित्र नकारात्मक असून येथील प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. येथील नागरिकांनी अनेकदा घोलवड आणि बोर्डी रोड या स्थानकांमध्ये पायाभूत सुविधेसह धीम्या गाड्यांची संख्या वाढविणे तसेच जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. घोलवड रेल्वे स्थानकात केवळ एका जलद गाडीला थांबा असून शटल तसेच प्यासेंजर गाड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. तर घोलवड पल्याडच्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची निर्मिती होऊन बावीस वर्षाचा दीर्घ कालावधी उलटूनही स्थिती अत्यंत विदारक आहे. दिवसाकाठी केवळ चार गाड्या थांबतात शिवाय प्रवाशांना गाडीत चढण्या-उतरण्या करिता प्लॅटफॉर्म, शेड, स्वच्छता गृह, कायम स्वरूपी तिकीट खिडकीचा अभाव आहे. अन्य पर्याय नसल्याने येथील नागरिक नाईलाजस्तव जीव मुठीत घेईन धोक्याचा मार्ग चोखाळत आहेत. दरम्यान, मागील दहा वर्षात या भागात मोठ्या संख्याने शिक्षण, पर्यटन, कृषी, मासेमारी आणि औद्योगिक विकास झाला आहे. तथापि प्रवाशी संख्याही झपाट्याने वाढली आहे.>डहाणू रोड ते वापी दरम्यान गाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. उंबरगाव, भिलाड, वापी हा औद्योगिक पट्टा विकसीत झाला आहे. जिल्हयाप्रमाणेच मुंबईपासून नागरिक रोजचा प्रवास करतात. त्या मुळे रेल्वे मंत्रालयकडे वर्षभरपासून पाठपुरावा करण्यात आला असून सकारात्म निर्णय अपेक्षित आहे. - मकरंद चन्ने अध्यक्ष, पालघर जिल्हा कॉंग्रेस, सोशल मीडिया सेल स्थानिकांसह आदिवासींच्या विकासाचे धोरण राबवायचे असल्यास सीमा भागातील स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. - विनीत राऊत, झाई ग्रामपंचायत