ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी थांबली तरी शिवसेनेची भाजपाविरोधातील टीकेची धार अद्याप कमी झालेली नाही. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भाषणे देत फिरत आहे, त्यामुळे या सरकारचे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले.
रंगशारदा सभागृहात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित "गर्जते आई मराठी" कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कालच देशाची सुरक्षा हातात असणाऱ्या लष्कराच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली, या सरकारचे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे. यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भाषणे देत फिरत आहेत. यात परिवर्तन व्हायला हवं, मी आज राजकीय भाष्य करणार नाही, पण कारभारात बदल झाला पाहिजे."
यावेळी शिवसेनेच्या भविष्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले, "26 जानेवारीच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे शिवसेनेची 25 वर्षे युतीमध्ये सडली आहेत. पण आता पुढे जायचे आहे. नुसत्या कार्यक्रमांसाठी नव्हे तर मराठी माणसांच्या हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. पुढच्या काळात बाळासाहेबांना, मराठी माणसाला, कुसुमाग्रजांना अभिमान वाटावा अशी शिवसेना घडवायची आहे," असे ते म्हणाले.