विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना एकनाथ खडसे यांचा पारा चढला. वेळ संपल्याची बेल वाजवण्यात आल्यानंतर खडसेंनी तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. माझ्यावर तुमचा एवढा आकस का आहे? असा प्रश्न खडसे करताच सत्ताधारी बाकावरून शंभूराज देसाई उठले आणि त्यांनी मध्यस्थी करत आकस हे वाक्य मागे घ्यावे, अशी विनंती खडसेंना केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना एकनाथ खडसे कुपोषणाच्या मुद्द्यावर बोलत होते. तितक्यात वेळ संपल्याची बेल वाजली. त्यावर खडसे म्हणाले, "थांबू?"
खडसेंचा प्रश्न तालिका अध्यक्षांचे उत्तर
तालिका अध्यक्ष डावखरे म्हणाले, "आपली दहा मिनिटं झाली आहेत." त्यावर खडसे म्हणाले, "नाही. मी म्हटलंच होतं की, तुम्ही आल्यावर माझ्यात खोडा घालणार." तालिका अध्यक्ष म्हणाले, "११.२७ चालू केलं. ११.३७ ला बेल वाजली."
त्यानंतर खडसे संतापले. म्हणाले, "मी वेळ दिलेली आहे. मी भाषण थांबवतो. मला वेळ सांगा. मी भाषण करताना तुम्ही आले आणि म्हणून मी वेळ दिली. दुसरा असता तर वेळ दिली नसती. मला माहितीये की, तुम्ही असल्यानंतर कधीही... म्हणजे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. मी तुमच्या आक्षेप घेत नाहीये. मला वेळ सांगा. माझं भाषण मी थांबवतो."
माझी तुमची दुश्मनी आहे का?
तालिका अध्यक्ष म्हणाले, "इकडे नोंद केलेली आहे. ११.२७ ला आपण भाषण सुरू केलेलं आहे."
एकनाथ खडसे म्हणाले, "२५-२५ मिनिटं बोलतात त्यावेळी त्यांना थांबवायला आपल्याला वेळ नाही." तालिका अध्यक्ष म्हणाले, "फक्त विरोधी पक्षनेते २५ मिनिटं बोलले आहेत. बाकीचे वक्ते १०-१५ मिनिटं बोलले आहेत."
त्यानंतर खडसेंचा पारा चढला. ते म्हणाले, "दरेकर बोलले २२ मिनिटं. साठे बोललेत १५ मिनिटं. तुमचा माझ्यावर एवढा आकस का आहे हो?", असे खडसे म्हणतात तालिका अध्यक्ष डावखरे म्हणाले, "माझा तुमच्यावर आकस असण्याचे काहीच कारण नाहीये." त्यानंतर खडसे पुन्हा म्हणाले की, "माझी तुमची काय दुश्मनी आहे?" तालिका अध्यक्ष म्हणाले, "काहीच दुश्मनी नाहीये." तालिकाअध्यक्ष डावखरे आणि खडसेंमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच शंभूराज देसाई उठले आणि आकस शब्द हटवण्याची मागणी करत त्यांनी मध्यस्थी केली. शंभूराज देसाई म्हणाले, "नाथाभाऊ म्हटले तुमचा एवढा आकस का? असा शब्दप्रयोग करणे, हा त्या पदावर हेतू आरोप करण्यासारखा आहे. त्यामुळे आपण हे तपासून घ्या. आणि पिठासीन अधिकाऱ्यावर असा हेतू आरोप करणे... नाथाभाऊ, पिठासीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११.२७ भाषण सुरू केलं. नोंद काढून बघा. सभापती म्हणाले की, '११.३७ झाले म्हणून मी बेल वाजवली. तरीही तुम्ही थोडावेळ बोला.' एवढं देखील ते म्हटले. तरीसुद्धा तुम्ही म्हणत आहात की, तुमचा माझ्यावर एवढा आकस का आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, हा शब्द आपण मागे घेतला तर बरं होईल", असे शंभूराज देसाई म्हणाले.
दोन मिनिटं आधी भाषण का थांबवलं?
त्यानंतर खडसे म्हणाले, "माझ्यावर अत्यंत अवकृपा आहे. माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला काही वेगळं मत वाटत असेल, तर... मी भाषणंही थांबवतो आणि सगळंच थांबवतो. माझा एकच प्रश्न आहे की, माझं भाषण कोणत्यावेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या." तालिका अध्यक्षांनी वेळ सांगितल्यानंतर खडसे म्हणाले की, "दोन मिनिटं आधी भाषण का थांबवलं?" तालिका अध्यक्ष डावखरे म्हणाले, "आपण ज्येष्ठ सदस्य आहात. आपणच असं बोलायला लागलात तर आश्चर्य होईल", असे म्हणत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील वेळ कशी ठरवण्यात आली? याबद्दल विचारणा केली. त्यावरून गोंधळ सुरू झाल्यानंतर डावखरे यांनी कामकाज तहकूब केलं.