जयंत धुळप / ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 12 - जिल्ह्यातील कजर्त तालुक्यांतील नेरळ टॅक्सी स्टॅन्ड येथे मंगळवारी रात्री ८.30 वाजण्याच्या सुमारास, देशी बनावटीचे सिल्वर रंगाचे ४ पिस्तूले व १८ जिवंत काडतुसांसह एकाला अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. अटक करण्यात आलेला ६० वर्षीय आराेपी उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील जाेरेली काेटी येथील रहिवासी आहे.
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्हा पाेलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शानाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, सहा पोलीस निरीक्षक एस.एस.आव्हाड, महिला पोसई प्रियांका बुरुंगले, पोह्वा महेश पाटील, पोना भानुदास कराळे. पोह्वा देवा कोरम यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे.
आराेपी कडून जप्त करण्यात आलेल्या ४ पिस्तूले व १८ जिवंत काडतुसे यांची एकुण किंमत २ लाख ३ हजार ८०० रुपये आहे. गुन्ह्याचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोसई आर.के.ढवळे हे करीत आहेत.