बुलडाणा / वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची अवैध उचल करणाऱ्या जालना जिल्ह्यातील कंत्राटदाराला ठोठावण्यात आलेला कोट्यवधीचा दंड भरावाच लागेल, असे औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले असतानाच, राज्यातील इतर काही कंत्राटदारांनीही अशाच प्रकारे अवैध गौण खनिज उत्खनन केल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे. तसेच, अनेक ठिकाणी कामे विलंबाने सुरू असून, अवैध उत्खनननामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाशिम : कंत्राटदाराला ३.५५ कोटींचा दंड- वाशिम जिल्ह्यात महामार्गाचे काम करणाऱ्या ॲपको इन्फ्राटेक लि. या कंपनीविरोधात मालेगाव तालुक्यात पॅकेज ५ अंतर्गत अवैध उत्खननप्रकरणी ३.५५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला. - पॅकेज ५ अंतर्गत ८३ रचनांपैकी केवळ २३ रचना पूर्ण झाल्या आहेत. दीड वर्षापूर्वी कामाचा दर्जा आणि संथगतीमुळे सद्भाव इंजिनिअरिंग कंपनीकडून काम काढून घेऊन ते ॲपकोला देण्यात आले. मात्र, ॲपकोचे कामही संथगतीने होत आहे.
बुलडाणा - प्रकल्प क्षेत्राबाहेर जाऊन उत्खनन- प्रकल्प क्षेत्राबाहेर जाऊन गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पॅकेज सहाचे काम करणाऱ्या ॲपको इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीला गेल्या वर्षी ३२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, कंपनीने अजून दंड भरला नाही. प्रकरण सध्या अमरावती विभागीय आयुक्तांच्या कोर्टात आहे.- मेहकर तालुक्यातील डोणगाव व आंध्रुड परिसरातील सर्व्हे नं. ३५६ मधील २०८२ आर या शेतजमिनीवर विनापरवाना उत्खनन झाले. ४ फेब्रुवारी २०२० रोजी मेहकरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी दंडाची कारवाई केली. ६६ हजार ९०० ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आले.- शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी महामार्गालगत तीन फुटांचा सेवारस्ता सोडण्यात आला असला तरी माल भरलेले ट्रॅक्टर, हार्वेस्टर या मार्गावरून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
प्रकरणाची चौकशी सुरूसध्या या संदर्भातील प्रकरण विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे. या प्रकरणात जवळपास ३२ कोटी रुपयांचा दंड संबंधित कंपनीला झाला आहे.- उदय भरडे, एमएसआरडीसी अधिकारी, बुलडाणा. पॅकेज ४ ची जबाबदारी पीएनसी इन्फ्राटेक लि. कंपनीकडे, तर पॅकेज ५ ची जबाबदारी ॲपको इंजिनिअर्स प्रा. लि.कडे आहे. पॅकेज ५ मध्ये शेतजमिनीवर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ॲपको कंपनीला ३.५५ कोटींचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात चौकशीत आहे.- रवी काळे, तहसीलदार, मालेगाव (वाशिम)समृद्धीच्या कामासाठी शेतात अवैध उत्खनन केल्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून मालेगाव तहसीलदारांनी आमच्या कंपनीला दंडाचा आदेश दिला. त्याविरोधात आम्ही वाशिम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील केले असून, या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.- राजीव तिवारी, जनसंपर्क अधिकारी, ॲपको इंजिनिअर्स