ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - डाळीच्या अवैध साठ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर आटोकाट प्रयत्न केले जात असले तरी अवैध साठवणूक करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहे. आजवर खासगी गोदामांमध्ये अवैध साठा केला जात होता. परंतु काटोल येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामावर (वेअर हाऊस) टाकलेल्या धाडीत तब्बल २५ लाख रुपये किमतीचा अवैध तूरसाठा सापडला आहे. त्यामुळे आता शासकीय गोदामांमध्येसुद्धा डाळीचा अवैध साठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. शासन आणि प्रशासन या दोन्ही स्तरावर डाळीच्या साठवणुकीविरुद्ध कडक पाऊल उचलले जात असले तरी साठेबाजांवर मात्र कुठलाही परिणाम होत नसल्याचे अलीकडच्या कारवाईवरून दिसून येत आहे. इतकेच नव्हे आता तर राज्य शासनाच्या ह्यवेअर हाऊसह्णमध्येसुद्धा अवैध साठवणूक ठेवण्यापर्यंत व्यापाऱ्यांची मजल गेली आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने गेल्या गुरुवारी काटोल येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वेअर हाऊसच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत २५ लाख २१ हजार रुपये किमतीची (३१५.१५ क्विंटल) तूर डाळ जप्त करण्यात आली होती, हे विशेष. राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये माल ठेवताना फारशी चौकशी होत नसल्याची बाब आढळून आली आहे. केवळ शेतकऱ्याचा माल आहे आणि जागा उपलब्ध आहे, त्याच्याकडे परवाना आहे किंवा नाही, इतकेच तपासले जाते. परंतु याबाबीसुद्धा फारशा गांभीर्याने पाहिल्या जात नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाच्या गोदामामध्येअवैध साठवणूक करणे साठेबाजांना अधिक सोईचे जात असल्याची माहिती आहे.