पुणे : सध्या देशामध्ये धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत असून कलुषित वातावरण निर्माण झाले आहे. त्याला अशिक्षितपणा कारणीभूत असून लोकांचा विवेक हरवत चालला आहे. शैक्षणिक विकासाअभावी योग्य विचारांचाही विकास होत नाही. तुष्टीकरण आणि वोट बँकेच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. राजकारण्यांनी तुष्टीकरणाचे राजकारण करीत प्रत्येक घटनेकडे मजहबी चष्म्यातून पाहिल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे परखड मत ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता यांनी व्यक्त केले. केसरी- मराठा ट्रस्टच्यावतीने गुप्ता यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, महापौर मुरलीधर मोहोळ, दीपक टिळक, रोहित टिळक, प्रणती टिळक उपस्थित होत्या. यावेळी दीपक टिळक यांच्या हस्ते गुप्ता यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना गुप्ता म्हणाले, धर्म-जाती-रंग-व्यवसायावरुन भेदभाव करणे चूक आहे. सर्वांना समान न्याय असायला हवा. त्यामुळे तुष्टीकरण बंद झाल्याशिवाय देशात शांतता प्रस्थापित होणार नाही. माध्यमांनी समाजातील नकारात्मकतेचे वार्तांकन करायलाच हवे. त्याबाबत प्रश्नही उपस्थित केले पाहिजेत. सजग आणि सतर्क समाज निर्मिती हा पत्रकारितेचा धर्म आहे. नैतिक विचार आणि नैतिक आचरणाकरिता माध्यमांना आर्थिक सक्षमता लाभणे आवश्यक आहे. परंतू, त्याकरिता गैर मागार्चा अवलंब करुन आर्थिक बाजू सक्षम करणे गैर आहे. माहिती तंत्रज्ञानाचा दिवसागणिक विकास होत चालला असून माहितेचे जग विस्तारत आहे. डिजीटल माध्यमांनी स्पर्धा वाढविली असून माध्यमांसमोर फेक न्यूजचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोशल मिडीयामुळे माध्यमांच्या विश्वार्हतेला आव्हान दिले असून ते टिकविणे ही वृत्तपत्रांची जबाबदारी आहे. सिटीझन जर्नालिस्टद्वारे समोर येणारी माहिती सुद्धा पडताळून घेण्याची आवश्यकता आहे. ध्येयवादी पत्रकारितेची आवश्यक आहेच. परंतू, नागरिकांनीही प्रस्थापित वृत्तपत्र आणि माध्यमांवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे गुप्ता म्हणाले. वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी एकत्र येऊन संयुक्त मंच उभा करण्याची गरज आहे. पत्रकारितेला व्यापक स्वरुप देऊन केवळ वाचकांपर्यंत माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता देशातील सहिष्णूता, सलोखा वाढावा याकरिता काम करायला हवे. केवळ बातम्या न देता महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणी, साक्षरता, कुपोषण आदी विषयांवरही माध्यमांंनी काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. थोरात म्हणाले, मुद्रित माध्यमांचे महत्व कमी झालेले नाही. वृत्तवाहिन्या पाहिल्या तरी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्यांचे योगदान नाकारता येणार नाही. केसरीवाडा हा प्रेरणास्त्रोत आहे. हे वर्ष लोकमान्यांचे स्मृतीशताब्दी वर्ष असल्याने मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम व्हावा. प्रास्ताविक दीपक टिळक यांनी केले. तर सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. यावेळी विविध संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर निवृत्त कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. =========लोकमान्यांच्या नावे मिळालेला पुरस्कार म्हणजे आशीर्वाद आहे. लोकमान्यांच्या लेखणीला असलेली धार आणि स्वातंत्र्यलढ्याची किनार याच्या कसोटीवर उतरण्याचा माझा कायम प्रयत्न राहील असे गुप्ता म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याशी आपल्या परिवाराचा संबंध असल्याचे सांगत त्यांनी पुर्वजांचे नानासाहेब पेशव्यांसोबत असलेले जवळचे संबंध आणि जालियनवालाबाग हत्याकांड व शहीद भगतसिंहांपासून प्रेरणा घेऊन आजोबा स्वातंत्र्यलढ्यात आले त्यालाही गुप्ता यांनी उजाळा दिला.
धार्मिक तेढ वाढण्यास अशिक्षितपणा कारणीभूत : संजय गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 10:04 PM
धर्म-जाती-रंग-व्यवसायावरुन भेदभाव करणे चूक आहे.
ठळक मुद्देलोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण