नाथ महानुभक्तांचा भारतसंचार भारतीय भक्तिसाहित्यात समन्वयशीलता आणि यात्राधर्म हे मराठी संतपरंपरेचे दोन ठळक विशेष सांगता येतात. महानुभाव, नाथ, वारकरी, रामदासी इत्यादी संप्रदायांतील महापुरुषांनी लोकभाषा, लोकछंद आणि लोकमाध्यमांचा स्वीकार तर केलाच; पण त्याबरोबर लोकसंपर्कासाठी त्यांनी नित्य यात्रा केल्या. प्रवास केले. लोकवाणी हिंदी स्वीकारली. नाथसंप्रदायाचे प्रभावी प्रसारक गोरक्ष यांनी भारतभर भ्रमण केले. ते मूळचे महाराष्ट्राचे असावेत, हे सप्रमाण मांडले गेले आहे. नवनाथ आणि चौऱ्याऐंशी सिद्ध महात्म्यांनी अखंड देशयात्रा केल्या. नाथांच्या नजीकच्या काळातील महात्मा चक्रधर हे मूळचे गुजरातेतील भडोचचे. ते महाराष्ट्रात विदर्भाच्या ऋद्विपूरकडे आले. त्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. नाथांचे समकालीन महात्मा बसवेश्वर. त्यांनी आजच्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मोठे समाजप्रबोधनाचे कार्य केले.आद्य मराठी ग्रंथ म्हणून गौरविला जाणारा ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ चक्रधरांच्या व्यापक लोकसंपर्काचा आणि प्रवासाचा परिपाक आहे. त्यांनी अखेरशेवटी ‘उत्तरांपथे गमन’ केले अशी महानुभावीय धारणा आहे. चक्रधरांचे अनुयायी पुढे उत्तरेत गेले. काबूल-कंदाहारपर्यंत पोहोचले. तिथे त्यांनी मराठी ही ‘धर्मभाषा’ म्हणून जनतेसमोर ठेवली. ज्ञानदेवादींची काशीयात्रानेवासे येथे श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाची परिसमाप्ती केल्यानंतर ज्ञानदेवादी भावंडे आणि संत नामदेवरायासह इतर संतांचा मेळा वाराणसीकडे यात्रेसाठी गेला. नामदेवांची तीर्थावळीही या प्रवासावर चांगला प्रकाश टाकते. संत एकनाथांनी गुरू जनार्दनस्वामींच्या आज्ञेवरून दीर्घयात्रा केल्या. देशावलोकन केले. ते पुढे वाराणसीत तीन वर्षे राहिले. नाथांच्या रुक्मिणी स्वयंवराची रचना त्यांच्या काशीनिवासाच्या काळात झालेली आहे. या ग्रंथाच्या प्रतीही उत्तरेत मिळालेल्या आहेत. कबीरगुरू रामानंद हे दक्षिणेतून बहुधा महाराष्ट्रमार्गे उत्तरेकडे गेले. शंकराचार्य, रामानुज, निंबार्क, मध्व असे सारेच आचार्य दक्षिणेत झाले. ते नंतर उत्तर भारतातही लोकमान्य झाले. शंकराचार्यांनी लिहिलेले पंढरीच्या पांडुरंगाचे स्तोत्र सर्वश्रुत आहे. चैतन्य महाप्रभू मुख्यत: बंगाल-ओरिसात वावरले. ते पंढरपूरला येऊन गेल्याचे काही पुरावे देता येतात. रामदासांचे देशाटन समर्थ रामदासांनी भरपूर देशयात्रा केली. ‘परचक्र निरुपण’ वर्णून ठेवले. इ. स. १६२२ ते १६४४ या काळात उत्तरेकडे वावरले. नंतर १६४४ ते १६५६ ते कृष्णा खोऱ्यात फिरले. रामदासांनी देशात अनेक ठिकाणी एकूण अकराशे मठ स्थापन केल्याचे सांप्रदायिक सांगतात. आज त्यापैकी एकूण सत्तर मठ अस्तित्वात आहेत. तंजावरचाही रामदासी मठ आणि त्याने राखलेली हस्तलिखिते नोंद घेण्यासारखी आहेत. ग्वाल्हेर-इंदूर भागातील रामदासी मठांचे कार्य प्रशंसनीय आहे. सहावे शीख गुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास यांची प्रत्यक्ष भेट घडली. पुढे रामदासांच्या कार्याला ऐतिहासिक वळण मिळाले, हे अनेक प्रमाणांसह स्पष्ट केले गेले आहे. महाराष्ट्रातून जसे भक्त महंत अन्यत्र गेले, तसे इतर प्रांतातून महाराष्ट्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोण आले याचा अभ्यास करायला हवा. (लेखक संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
संतांची भ्रमंती आणि साहित्याची निर्मिती
By admin | Published: April 02, 2015 3:14 AM