मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 08:03 PM2018-07-23T20:03:56+5:302018-07-23T20:08:02+5:30
भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली.
पुणे : भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली.
आषाढी एकादशीनिमित्त सिंग यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मोकळेपणाने आपली मते मांडली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपला चिमटेही काढले. ते म्हणाले की, भाजपमध्ये कोणत्याही मंत्र्याला बोलण्याचा अधिकार नाही. अंतर्गत व्यवस्थेवर मध्यंतरी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना तर वैयक्तिक स्तरावर अधिकाऱ्यांची निवड करण्याचाही अधिकार नसल्याचा उच्चार त्यांनी केला. एवढेच नाही तर मला राजनाथ सिंग यांची दया येते अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एमआयएम पक्षाच्या ओवैसी यांनी मध्यंतरी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. ज्याप्रमाणे भाजप धर्मांध हिंदुत्वाचा अजेंडा पुढे आणत आहे त्याप्रमाणे एमआयएम धर्मांध मुस्लिम जातीयत्वाचा मुद्दा वापरत असल्याचे ते म्हणाले.