मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेताना कोणतीही घाई मी करणार नाही; पण विलंबही करणार नाही. माझा निर्णय संविधानातील तरतुदी व कोर्टाच्या निर्देशानुसार असेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ब्रिटन दौरा आटोपून ते सोमवारी परतले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. आपली बाजू मांडण्यासाठी काहींनी वेळ मागून घेतला आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
‘रिझनेबल टाइम’ची अशी केली व्याख्या -आमदार अपात्रतेसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ म्हणजे -‘रिझनेबल टाइम’ अशी व्याख्या अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. निवेदन झिरवाळांकडे कोर्टाने दिलेल्या निकालानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना भेटून केली. अध्यक्षांना घेराव करू, त्यांना फिरू देणार नाही, अशी भाषा विरोधक करीत आहेत. ते कोणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेणार नाहीत. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री