पुणे : उसाची लागवड वाढल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला, असे म्हणायला मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. मराठवाड्यात गेल्या २० वर्षांपासून साखर कारखाने सुरू असून, तिथे आजच्यासारखा भीषण दुष्काळ कधी पडला नव्हता. त्यामुळे त्यामागच्या कारणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये समिती स्थापन करण्यात आली असून, त्याचे निष्कर्ष येत्या १५-२० दिवसांत समोर येतील, असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करताना राजेंद्र सिंह यांनी या दुष्काळासाठी साखर कारखाने कारणीभूत असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार यांनी वरील वक्तव्य केले. दुष्काळाची शास्त्रशुद्ध मीमांसा झाली पाहिजे, असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. जलसंधारणाची कामे करण्यासाठी सहकारी व खासगी सहकारी कारखाने प्रत्येकी २५ लाखांची मदत करणार आहेत. मराठवाड्यात जलसंधारणाच्या कामासाठी प्रत्येक साखर कारखान्याने १० लाख रुपये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करावेत, असे आवाहन शरद पवार यांनी बैठकीत केले. त्यास सर्व प्रतिनिधींनी एकमताने सहमती दर्शविली.
मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही
By admin | Published: April 22, 2016 4:21 AM