पुणे - महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. कोथरूड येथील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारसभेनंतर राज यांनी हडपसर येथे प्रचारसभा घेतली.
माझा वसंत मोरे तुम्हाला जे जे वचन देईल, ते वचन तो निवडून आल्यावर पाळेल याची मला खात्री आहे. माझा उमेदवार वसंत मोरे देणारा आहे, हडप करणारा नाहीय. एका चांगल्या भवितव्यसाठी आणि सबळ विरोधीपक्षासाठी माझ्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राज यांनी हडपसर येथील सभेत केले. जर बदल घडवायचा असेल तर अशी माणसं विधानसभेत हवी ज्यांना तुमच्याबद्दल तळमळ आहे आणि काही करून दाखवण्याची धमक आहे, मला अभिमान आहे, अशी माणसं माझ्याकडे आहेत. माझ्या उमेदवारांच्या मनात आणि पोटात आग आहे,त्यांना तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांना तुमच्यासाठी लढायचं आहे. माझ्या वसंत मोरेने नगरसेवक म्हणून जे काम केलं आहे, ते काम पुण्यात कुठेही झालं नसेल, असे राज म्हणाले.
शिवसेना म्हणते 10 रुपयात जेवण देऊ तर भाजप म्हणतंय की, आम्ही 5 रुपयात जेवण देऊ. शिवसेना भाजप युतीत आहे, पण आश्वासन देण्यापुरतं, ह्यांच्यात पायपोस नाही. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यांच्यावर जर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष नसेल तर तुमच्यावर वरवंटा फिरला म्हणून समजा. मतदानाच्या आधल्यादिवशी कोण किती पैसे वाटतोय, कोण जेवणावळी घालतोय, कोण कोणाच्या नात्यातला जातीतला आहे, यावरुन आपण मतदान करतोय, म्हणून आपला विकास होत नाही. या निवडणुकीच्या वेळेस तरी याचा विचार करणार आहात का? मी एका गोष्टीची वारंवार आठवण करून देत आहे की; देशात आर्थिक मंदीचं सावट आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसतोय आणि बसेल. लक्षात ठेवा की मी तुम्हाला घाबरावयाला किंवा विरोधाला विरोध करायला म्हणून हे सांगत नाही. मी तुम्हाला जागं करायचा प्रयत्न करतोय, असे सांगत भावनिक आवाहनही राज यांनी केलं.