ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - शाहरुख खानचा "डुप्लिकेट" चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला नक्की आठवत असेल की कसं त्यामध्ये हुबेहूब दिसत असल्याचा फायदा उचलत एकमेकांची ओळख चोरली जाते. पण पडद्यावरची ही कहाणी रवींद्र गायकवाड यांनी सत्यात उतरवली असून लोकांना चकवण्यासाठी त्यांनी ही फिल्मी पद्दत अंमलात आणली आहे. एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर प्रकाशझोतात आलेले शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड लोकांपासून दूर राहण्यासाठी आपल्यासारख्या हुबेहूब दिसणा-या व्यक्तीचा वापर करत आहेत. गायकवाड आपल्या डुप्लिकेटला आपल्यासारखे कपडेही घालायला सांगत असून स्वत:ला त्यांचा सेक्रेटरी असल्याचं सांगत आहेत.
मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे. आधी चप्पलकांड आणि त्यानंतर विमान कंपन्यांनी केलेली प्रवासबंदी यामुळे रवींद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले. यामुळे जेव्हा कधी ते बाहेर जातात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी लोक गर्दी करतात. अशा परिस्थितीतून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी रवींद्र गायकवाडांनी आपला डुप्लिकेट रत्नकांत सागर याला आपल्यासोबत ठेवलं आहे. लोकांना खरा आणि खोटा यामधील फरक कळू नये यासाठी त्यांनी संसद सोडून बाकी सर्व ठिकाणी आपल्यासारखा कुर्ता, पायजमा घालण्याचा आदेशच त्याला दिला आहे. तसंच स्वत: मात्र टी शर्ट आणि पँट घालतात.
"एअर इंडिया प्रकरणी आणि मीडिया ट्रायलनंतर अनेक लोक मला ओळखू लागले आहेत. ते माझ्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करत असतात. मी त्यांना नकार देऊ शकत नाही. पण यामधे खूप वेळ वाया जातो. यासाठी मी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता रत्नकांत सागर, जो गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत आहे त्याची निवड केली. आता मी लोकांमध्ये सागर म्हणून वावरतो. आमच्यामध्ये खूप साम्य आहे. तो खासदार वाटावा यासाठी माझा कुर्ता, पायजमाही मी त्याला दिला आहे", असं रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं आहे.
एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण-
खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.