पुणे : ‘नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’.... ‘मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा’....‘नाटक नव्हे, तीन तासांचे अर्करूप अस्तित्व संपले आहे ते इथे फक्त माझ्याजवळ’... थरथरता तरीही धीरगंभीर आवाज, कातर स्वर, ‘चष्मा नको’ असे म्हणत स्वत:च्या दृष्टीवरचा विश्वास आणि कुसुमाग्रजांच्या शब्दांतून व्यक्त होणारा ‘नटसम्राट’... मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट अशी मुशाफिरी करणारे डॉ. श्रीराम लागू कुसुमाग्रजांच्या कवितेत रमले आणि त्यांच्या ‘परकाया प्रवेशाचा’ अत्युच्च आविष्कार रसिकांनी ‘वाहवा’ची दाद देत अनुभवला.निमित्त होते ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या वाचनाचे. कुसुमाग्रजांच्या ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘पाथेय’ या संग्रहांतील निवडक कवितांचे एकत्रीकरण असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या कवितासंग्रहाचे वाचकांसाठी नव्याने प्रकाशन झाले. कुसुमाग्रजांच्या श्रीराम लागू यांच्या आवाजातील कवितांच्या ‘कवितेच्या पलीकडे’ या सीडीचे अनावरणही या वेळी झाले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरी आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी डॉ. श्रीराम लागू, रामदास भटकळ, विजय लागू, रेणुका माडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते. भटकळ म्हणाले, ‘मी कुसुमाग्रजांच्या कविता ऐकल्या, वाचल्या आणि अनुभवल्या आहेत. प्रत्येक वेळी कवितेचा नवा अर्थ उलगडत जातो. ‘नटसम्राट’ नाटकाला डॉ. श्रीराम लागू यांनी सर्वोच्च दर्जा मिळवून दिला. या नाटकातील भूमिकेत शिरलेले लागू त्यांना स्वत:ला समोर बसून अनुभवता येणार नाहीत, हे दुर्दैव. त्यांचे कवितावाचन पुढील पिढीपर्यंत गेल्यास तरुणाई समृद्ध होईल, याची खात्री वाटते.’(प्रतिनिधी)>कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त देशपांडे म्हणाले, ‘मी लहानपणापासून कुसुमाग्रजांच्या कवितांचा आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाचा चाहता आहे. कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त आहेत. त्यात कधी आत्मचिंतनपर स्वगत, नाट्यछटेचा रंग, कधी नाट्यात्मक संवाद तर कधी कथाकथन अनुभवायला मिळते. लिखित भाषेचा गोडवा आणि गावरान भाषेचा ठसकाही अनुभवतो. मला कवींचे गद्य नेहमीच भावते. कुसुमाग्रजांच्या गद्याला आंतरिक लय असते आणि डॉ. लागू यांनी लयीचे भान ठेवत वाचन खुलवले आहे. त्यांच्या वाचनातून कवितेची मूळ व्यक्तिरेखा न बदलता ती श्रीमंत झाली आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेला अभिप्रेत असलेला ध्वनी म्हणजे डॉ. लागू यांचा आवाज आहे. लिखित अक्षरवाङ्मयाला समर्पक ध्वनिस्वरूप लाभले आहे.’
मी उभा आहे रंगमंचावर एकटा...
By admin | Published: February 28, 2017 1:36 AM