पुणे : विविध क्षेत्रांत काम करीत असताना महिलांना अडथळ््यांचा सामना करावा लागतोय. पण आजची स्त्री सक्षम आहे आणि सर्व क्षेत्रांत नेतृत्व करू शकते, असा विश्वास व्यक्त करीत ‘उठ मेरी जान तुझे मेरे साथही चलना है’ असा नारा लोकमत वूमेन समिटच्या पाचव्या पर्वात गुंजला आणि महिलांना नवी उमेद देऊन गेला. कलर्स प्रस्तूत एनईसीसी सहयोगाने लोकमत वूमेन समिटच्या पाचव्या पर्वाचे शानदार उद्घाटन रविवारी महिला बालविकास, ग्रामविकास, जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध लेखक चेतन भगत, आॅल इंडिया अॅन्टिटेररिस्ट फ्रन्टचे प्रमुख मनिंदरसिंग बिट्टा, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा संजय काकडे, अजमेरा हाउसिंगच्या प्रमुख हिता अजमेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. महिलांवरील अत्याचारापासून ते त्यांनी गाठलेल्या कर्तृत्वाच्या शिखरापर्यंत महिला सक्षमीकरणाच्या अनेक मुद्यांवर या समिटमध्ये चर्चा झाली. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. महिलांनी अबला बनून राहण्यापेक्षा सबला बनणे आवश्यक आहे, याची जाणीव त्यांच्यामध्ये आणि समाजातही झाली आहे. आजच्या काळातील स्त्री ही केवळ पुरोगामी नाही तर परंपराही टिकवून पुढे नेणारी आहे. ती पुरोगामित्व आणि परंपरेचे सुंदर प्रतीक आहे.स्त्री होण्याचा मला अभिमान आहे आणि तो प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रांत काम करीत असताना महिलांना अडथळ््यांचा सामना करावा लागतो. पण लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. तसे केले तरच महिलांमधील नेतृत्वगुण विकसित होतील. ’’चेतन भगत म्हणाले, ‘‘आजची व्यवस्था पुरुषांनी त्यांच्या अनुरूप तयार केलेली आहे. महिलांचा विचार केला गेलेला नाही. गेल्या ५० वर्षांत महिला सशक्तीकरणात महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. महिलांना समानतेची वागणूक द्यायची असेल तर ही व्यवस्था स्त्री-पुरुष या दोघांचाही विचार करून तयार केली गेली पाहिजे. मनुष्यजातीच्या ५ हजार वर्षांच्या इतिहासात पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या ५० वर्षांत हे चित्र बदलत असून, महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न वाढत आहेत. एका रात्रीत चित्र बदलायला हवे, अशी आशा ठेवणे चुकीचे आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जात नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत.’’ मनिंदरसिंग बिट्टा म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतातील स्त्री सशक्त आहे. कॅप्टन लक्ष्मी, इंदिरा गांधी ही त्याची उदाहरणे आहेत. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या विविध भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशाचे शिखर गाठणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणले गेले पाहिजे.’’ उषा काकडे म्हणाल्या, ‘‘लोकमत वूमेन समिटने महिलांचे प्रश्न प्राधान्यक्रमावर आणले आहेत.’’ लोकमत डॉट कॉम या संकेतस्थळावर दिवसभर या कार्यक्रमाचे वेब कास्टिंग झाले. जगभरातून या वूमेन समिटला आॅनलाइन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अजमेरा हाऊसिंगच्या सहयोगाने आयोजित या कार्यक्रमाचे आऊट डोअर पार्टनर सुलेखा कम्युनिकेशन प्रा. लि., एज्युकेशन पार्टनर सिंहगड इन्स्टिट्यूट, सहप्रायोजक मुद्रा लाईफ स्पेसेस, मुछाल साडी हे आहेत. समाजात स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, भेदभाव, दु:ख-दैन्य पाहून यामध्ये बदल घडविण्यासाठी (स्व.) ज्योत्स्ना दर्डा यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १९९९मध्ये ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना केली. आज या मंचाच्या देशभरात २ लाख ९८ हजार सक्रिय सभासद आहेत. यातूनच महिलांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी लोकमत वुमेन समिट ही राष्ट्रीय स्तरावरील चळवळ उभी राहिली. गेल्या पाच वर्षांपासून या वुमेन समिटमध्ये चर्चा झालेले प्रश्न संसदेपर्यंत गेले. परंतु, आजही महिलांना समाजात चांगली वागणूक मिळत नाही. ‘टेक इट ग्रॅन्टेड’ घेतले जाते. समाजात जो खरा सन्मान मिळायला हवा तो मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना घडतात. देशाला मजबूत करायचे असेल तर प्रत्येकाला आपल्या घरातून समानता आणावी लागेल आणि महिलांना सन्मान द्यावा लागेल. त्यासाठी देशपातळीवर पार्श्वभूमी तयार करण्याचे काम लोकमत वुमेन समिटच्या माध्यमातून होत आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी ‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती ही अनोखी संकल्पना सुरू केली आणि गणेशोत्सवात पौरोहित्यापासून सर्वच गोष्टी महिलांनी केल्या. तृतीयपंथीयांंनाही गणेशाच्या आरतीचा सन्मान देण्यात आला. ज्याची दखल युनोमध्येही घेण्यात आली.- खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि.
अडथळ्याला पार करून उठ मेरी जान...
By admin | Published: November 23, 2015 2:34 AM