स्रेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून तब्बल सहा महिने उलटूनही अद्याप त्याविषयी शासनाने परिपत्रक काढले नसल्याने आता इंडियन मेडिकल असोसिएशन पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. १८ डिसेंबर २०१६ ला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पॅनल्सने एकहाती विजय मिळविला. मात्र अद्याप महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निकालाविषयी शासनाने परिपत्रक न काढल्याने आयएमएच्या सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यकारिणीत १८ सदस्य असतात. यामध्ये ९ सदस्य डॉक्टरांमधून निवडले जातात. चार सदस्यांचे आजीवन सदस्यत्व असते, तर पाच शासननियुक्त सदस्य असतात. २४ डिसेंबर, २०१६ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र अद्याप इंडियन मेडिकल असोसिएशनचे पॅनल परिपत्रकाच्या प्रतीक्षेत आहे. या परिपत्रकाच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यकारिणीची नियुक्तीही लांबणीवर पडत असल्याची खंत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.२००९ सालीसुद्धा शासनाने परिपत्रक जाहीर करण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी घेतला होता. त्यानंतरही न्यायालयाने कान टोचल्यानंतर सहा आठवड्यांनी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी केवळ परिपत्रकासाठी इतका कालावधी घेऊ नये, अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची शासनाकडे मागणी असल्याचे डॉ. लेले यांनी सांगितले. निकालानंतर दोन वेळा शासनाच्या संबंधित विभागांना या परिपत्रकाविषयी सूचित करण्यात आले होते. मात्र त्या निवेदनाची पोचपावतीही पाठविली नसल्याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेविषयीचा शासनाचा कमालीचा उदासीन कारभार यातून दिसून येतो आहे. त्यामुळे आता इंडियन मेडिकल असोसिएशन या परिपत्रकासाठी पुन्हा न्यायालयात जाणार आहे, असे डॉ. लेले यांनी स्पष्ट केले.अशी असते कार्यकारिणीनिवडणुकीत विजयी नऊ सदस्यांचे पॅनल आजीवन सदस्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), कॉलेज आॅफ फजिशिअन्स अँड सर्जन्स आॅफ मुंबई यांचा समावेश.पाच शासननियुक्त सदस्य४९ उमेदवारांमध्ये रंगली होती निवडणूकमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी ४९ उमेदवार रिंंगणात होते. त्यापैकी आयएमएच्या नऊ सदस्यांचा विजय झाला. वैद्यकीय परिषदेकडे ८ सप्टेंबर, २०१६ पर्यंत नोंदणी केलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरांचा व नोंदणीचे नूतनीकरण केलेल्या डॉक्टरांचा या मतदार यादीत समावेश होता.>विजेते पॅनलइंडियन मेडिकल असोसिएशनच्या पॅनलमध्ये डॉ. जयेश लेले (मुंबई), डॉ. संजय कदम (नांदेड), डॉ. अशोक तांबे (बारामती), डॉ. अर्चना पाटे (डोंबिवली), डॉ. मंगेश गुलवाडे (चंद्रपूर), डॉ. अनिल लद्दड (नागपूर), डॉ. दिलीप सारडा (पुणे), डॉ. निसार शेख (अहमदनगर) आणि डॉ. शिवकुमार उत्तुरे (मुंबई) यांचा समावेश आहे.
‘आयएमए’ पुन्हा न्यायालयात
By admin | Published: May 14, 2017 5:30 AM