लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: कोविडच्या महामारीतही खाजगी क्षेत्रातील रूग्णालय कर्मचारी,डॉक्टर्स यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रचंड काम केले. कितीतरी डॉक्टरांना उपचार करतांना स्वतःलाच कोरोनाची लागण झाली. अनेक डॉक्टर्स मृत्युच्या दारातून परतले. मात्र अशी सेवाकार्य करत असताना शुल्लक कारणांनी त्याना मारहाण, धमक्या, रुग्णालयावर हल्ले असे सत्र सुरू आहेत. त्याबद्दल केंद्र, राज्य सरकार काहीच करत नाही, त्यामुळे १८ जून रोजी देशभरात सर्वत्र डॉक्टर प्रतिकात्मक निषेध म्हणून काळ्या फिती वापरून काम करणार आहेत. आयएमएचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांच्यासह डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. भक्ती लोटे, डॉ. नीती उपासनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सतत हे हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने त्या विरोधात कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकंटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी. या समाजकंटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद या कायद्यात असावी. रूग्णालय आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी, अशी।मागणी त्यांनी केली. याबाबत बुधवारी त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, हल्ले होत असतानाही रुग्णसेवा कार्य अखंडित राहण्यासाठी डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून काम करत आहेत. पण काही ठिकाणी दमदाटी करणे, अर्वाच्च भाषा वापरणे इथपासून ते जीवघेणी मारहाण करणेपर्यंत हे हल्ले होत आहेत. आसाम मध्ये डॉ. दत्ता या वरिष्ठ डॉक्टरांवर असाच प्राणघातक हल्ला झाला आणि त्यांचा त्या हल्ल्यात मृत्यु झाला. गेल्या काही दिवसात असे बरेच हल्ले भारतातील विविध राज्यात डॉक्टरांवर झाले. आसाम मधे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या चित्रफिती मध्ये हे हल्ले किती भयानक आणि अमानुष आहेत हे उघडपणे दिसले. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब कठोर पावलं उचलणे आवश्यक आहे. त्यातच रामदेव योग गुरूंनी डॉक्टरांची आणि आधुनिक उपचार पद्धतीची अपमानास्पद खिल्ली उडवली. मृत डॉक्टरांबद्दल त्यांनी हीन वक्तव्य करून त्यांचा अपमान केला. ह्या रामदेव वर सरकार कारवाई का करत नाही? हे अनाकलनीय आहे. असोसिएशनची यासह कायदा बनवण्याची मागणी करत आहे. तरी सरकारने यापुढेही दाद न दिल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल असे पाटे म्हणाले.