पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. संत गोरोबा काका यांचे स्मरण करण्यासाठी संमेलनस्थळी ५२०० पुस्तकांच्या माध्यमातून प्रतिमा साकारली जाणार आहे. शिरोढाण येथील राजकुमार कुंभार या चित्रकाराने ही प्रतिमा साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य संमेलनात प्रतिमा साकारणारा पहिला जिल्हा म्हणून उस्मानाबादची देशभरात ओळख निर्माण होणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडीदरम्यान, तसेच संमेलनस्थळी आकर्षक रांगोळी काढून साहित्यप्रेमींचे स्वागत केले जाते. उस्मानाबाद येथे होत असलेल्या संमेलनामध्ये पुस्तकांच्या माध्यमातून अनोखी रांगोळी साकारुन नवा विक्रम रचला जाणार आहे. साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर संत गोरा कुंभार रचित अभंगातील ‘म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा’या पंक्ती चितारल्या आहेत. संमेलनात संत गोरोबा काकांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. गोरोबा काकांच्या अभंगासह त्यांच्यावर इतर संतांनी लिहिलेल्या एकत्रित अंभगांच्या एकाच पुस्तकाच्या ५२०० प्रतिमांमधून हे चित्र साकारणार आहे.गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. संत गोरोबांचे अभंग वाचले, की हा माणूस किती संवेदनशील होता, याची कल्पना येते. ते खेचरी मुद्रा लावून अवकाशाच्या पार विश्वाशी नाते जोडत होते. त्यांची हीच महती संमेलनाच्या निमित्ताने अधोरेखित केली जाणार आहे.‘लोकमत’शी बोलताना राजकुमार कुंभार म्हणाले, ‘अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेकडून गोरोबा काकांच्या अभंगाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. तेर येथील प्रा. दीपक खरात यांनी संपादित केलेले पुस्तक ३२ पानांचे असून, यामध्ये काकांनी लिहिलेल्या अभंगांसह संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांनी त्यांच्यांवर लिहिलेल्या अभंगांचा समावेश आहे. संमेलनात साकारली जाणारी पुस्तकाच्या माध्यमातील जगातील पहिली प्रतिमा म्हणून हा विक्रम नोंदवला जाईल. संत साहित्यिक संत शिरोमणी श्री गोरोबाकाकांची प्रतिमा ५० फूट बाय ५० फूट अशा भव्यदिव्य आकारात विक्रमी साकारली जाणार आहे. ही संकल्पना साकारण्यासाठी कुंभार यांना मोहन जगदाळे, नागनाथ कुंभार, दीपक खरात, देवराव कापडे, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था व आयोजक संस्थेचे सहकार्य लाभले.--साहित्य संमेलनात प्रत्येक वेळी रांगोळी काढून साहित्यप्रेमींचे स्वागत केले जाते. संत गोरोबा काकांच्या पावन भूमीत त्यांच्यावर आधारित पुस्तकांच्या प्रतींमधून त्यांची प्रतिमा साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुरुवारी, ९ जानेवारी रोजी प्रतिमा साकारली जाईल. साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरेल, यात शंका नाही.- राजकुमार कुंभार, चित्रकार
संमेलनस्थळी ५२०० पुस्तकांमधून साकारणार 'संत गोरोबा काकां' ची प्रतिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 11:00 PM
५० फूट बाय ५० फूट अशा भव्यदिव्य आकारात असणार संत साहित्यिक श्री गोरोबाकाकांची प्रतिमा
ठळक मुद्दे शिरोढाण येथील राजकुमार कुंभार या चित्रकाराचा ही प्रतिमा साकारण्यासाठी पुढाकार संमेलनात साकारली जाणारी पुस्तकाच्या माध्यमातील जगातील पहिली प्रतिमा म्हणून हा विक्रम