ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - अतिलठ्ठपणावर उपचार करुन घेण्यासाठी इजिप्तहून मुंबईत आलेल्या इमान अहमदला पुढील उपचारासाठी अबु धाबीच्या बुरजील रुग्णालयात हलवण्यात येऊ शकते. बुरजील रुग्णालयाने इमान अहमदवर उपचार करण्याची तयारी दाखवली आहे. बुरजील हे व्हीपीएस ग्रुपचे रुग्णालय आहे. दिल्लीतील व्हीपीएस समूहातील चार डॉक्टरांचे पथक इमानच्या सर्व फाईल्स तपासणार आहे. सर्वकाही जुळून आले तर, इमानला पुढील उपचारासाठी अबु धाबीच्या रुग्णालयात हलवण्यात येईल.
काही महिन्यांपूर्वी जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी इमानची ओळख होती. इमानला मुंबईत आणले तेव्हा तिचे वजन 500 किलो होते. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात डॉ. मुफझ्झल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने उपचार करुन इमानचे वजन 173 किलोने कमी केले. पण इमानची बहिण शायमा सेलिमनेला हा दावा मान्य नाही. इमान अहमद सध्या आजारी असून सैफी रुग्णालयाकडून तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला आहे. डॉ मुफझ्झल लकडावाला खोटं बोलत असल्याचा आरोप तिने केला.
इमानच्या उपचारावर सैफी रुग्णालयाने आतापर्यंत 2 कोटी रुपये खर्च केले असून, ती पूर्णपणे फीट असून तिला पुन्हा इजिप्तला तुम्ही घेऊन जाऊ शकता असे डॉक्टरांनी सांगितले आहे. इमानच्या प्रकृतीचे स्वतंत्रपणे मुल्यमापन व्हावे यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहे असे डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले. इमानवर उपचार करणा-या 13 डॉक्टरपैकी त्या एक आहेत.