पुणे : पासपोर्टसाठी पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या आधार कार्डातील व पासपोर्ट केलेली माहिती जुळल्यास त्याला पासपोर्ट कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय पासपोर्ट विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. पासपोर्टसाठी करण्यात येणारी पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्यानंतर पार पाडली जाणार आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर सध्या पासपोर्ट मिळण्यास एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. संबंधित अर्जदाराच्या नावावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत याची चौकशी करण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने पासपोर्ट मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे लगेच परदेश दौऱ्यावर जाणे आवश्यक असलेल्या अर्जदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता आधार कार्डातील व पासपोर्टसाठी दिलेली माहिती जुळल्यास संबंधित अर्जदाराचे पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया नंतर केली जाणार आहे. त्यामुळे अर्जदाराला लगेच पासपोर्ट मिळणे शक्य होणार आहे. त्यासाठी अर्जदाराला पासपोर्टच्या अर्जासोबत केवळ एक प्रतिज्ञापत्र जोडून द्यावे लागणार आहे. त्यामध्ये त्याच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नसल्याचे नमूद करावे लागणार आहे. आधार कार्ड व पासपोर्ट लिंक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आधार कार्डातील माहिती पासपोर्ट कार्यालयास उपलब्ध झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना आधार कार्ड त्याचबरोबर निवडणूक ओळखपत्र व पॅन कार्डची झेरॉक्सही जोडावी लागणार आहे. तात्काळ पासपोर्टसाठी वेगळया पध्दतीने अर्ज करावा लागत होता. या अर्जासोबत आयपीएस/आयएएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे शिफारस पत्र जोडून द्यावे लागत होते. मात्र अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिफारस पत्र देण्यास नकार दिला जात असल्याने तात्काळ मधून पासपोर्ट मिळणे अवघड बनले होते. यापार्श्वभुमीवर स्वत: प्रतिज्ञापत्रावर गुन्हे दाखल नसल्याची हमी दिल्यास तात्काळ पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. लगेच पोलीस व्हेरिफिकेशन करून मिळावे याकरिता पोलिस ठाण्यात सतत चकरा मारण्याचा अर्जदारांचा त्रास या निर्णयामुळे वाचणार आहे. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असताना पासपोर्ट मिळविण्याचा गैरप्रकारही यातून होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.