मुंबई : तब्बल दोन महिने देशभर सुरू असणारा मतसंग्राम आज नवव्या टप्प्यानंतर थांबला. सार्यांच्या नजरा आता १६ मेच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. निवडणूक आयोगानेही मतमोजणीसाठी जय्यत तयारी चालविली आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांतील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने २५ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमुळे अवघ्या ४ तासांत राज्यातील निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यभरात ४० ठिकाणी मतमोजणीचे काम होणार असून, ४८ मतदारसंघांतील ८९७ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला या वेळी होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली. राज्यात ३ टप्प्यांत झालेल्या मतदानात ६०.४२ टक्के मतदारांनी आपल्या मताधिकाराचा प्रयोग केला होता. शुक्रवारी राज्यात ‘ड्राय डे’ राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ३ टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदिवशी मद्य विक्री करणार्या दुकानांवर आयोगातर्फे परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. शिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत नमूद तरतुदीन्वये संबंधित परवानाधारकांवर फौजदारी कारवाईदेखील करण्यात येईल. (प्र्रतिनिधी)
निवडणूक आयोगाची लगबग मतमोजणीची
By admin | Published: May 13, 2014 3:47 AM