एकीकडे एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद होणार असल्याचे जाहीर होताच भाजपानेही आपली स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. यातच शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तर भाजपा देखील फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे. अशातच शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाही पत्रकार परिषद घेणार आहे.
भाजपा आणि शिवसेना शिंदे गट अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. भाजपाकडून दिल्लीमध्ये पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या खासदारांना अमित शाह यांच्या दालनात जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता लवकरच मुख्यमंत्री पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिंदे काही वेगळा निर्णय घेतात की महायुतीत मुख्यमंत्री पद सोडून मंत्रिपद घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामुळे या दोन्ही पत्रकार परिषदांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला २३५ हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. त्यात भाजपाला सर्वाधिक १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपाला छोटे पक्ष आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपा बहुमताजवळ पोहोचला आहे.