ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील बनवण्यात आलेली अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ हटवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. तसेच अतिक्रमण न हटवल्यास वनाधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा न्यायालयानं दिला आहे.अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. न्यायालयात ही याचिका मिलिंद एकबोटे यांनी दाखल केली असून, याचिकेवर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. कबर कोणाच्या जागेत असून, अतिक्रमणे कोणत्या जागेत आहेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. तेव्हा उत्तरदाखल कबर महसूल विभागाच्या जागेत आहे, अतिक्रमणे वन खात्याच्या भूखंडात आहेत, असे याचिकाकर्त्याने सांगितले. या प्रकारामुळे न्यायालय चांगलेच संतप्त झाले असून, वनाधिकारी आदेश देऊनही कारवाई करत नसतील तर त्यांना तुरुंगात शिक्षा भोगायला पाठवायला हवे किंवा त्यांना कायमचे वनातच ठेवायला हवे, असे न्यायालयानं म्हटलं आहे. जे अधिकारी कारवाई करत नसतील त्यांची नावे न्यायालयात सादर करा, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे.