नाशिक : भारतीय सेनेने पाकव्याप्त भागात केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर भारतीय सेनेचा जवान चंदू चव्हाण हा गेल्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानच्या सीमेत अनावधानाने गेला होता. सदर वार्ता ऐकून त्याच्या आजी लिलाबाई (६५) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आजीच्या अस्थींचे चव्हाण याने रविवारी दुपारी नाशिकच्या गोदापात्रातील रामकुंडात विसर्जन केले. नाशिकच्या शेजारील धुळे जिल्ह्यातील बोरविहिर येथील रहिवासी असलेला चंदू हा सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी जम्मू काश्मिरमधील पुंछ सेक्टरमध्ये कार्यरत होता. सप्टेंबर महिन्यात चंदू चुकून पाकच्या हद्दीत गेला यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी त्याला कैद करत अंधारकोठडीत डांबले होते.
शनिवारी प्रथमच तो बोरविहिर या मुळ गावी आला. त्यानंतर आज दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास चंदू आपल्या भावासह मामा, आत्याबहीण आदि नातेवाईकांसोबत आजीच्या अस्थी विसर्जनासाठी गोदाकाठावर पोहचला. आजीचे लिलाबाई पाटील (६५) यांच्या अस्थींचे विसर्जन चंदू याने रामकुंडाजवळील अस्थीकुंडात केले. यावेळी चंदू यांनी हंबरडा फोडला. चंदू यांना अश्रू अनावर झाले होते. अस्थी विसर्जनानंतर चव्हाण यांनी रामकुं डात उतरून आंघोळ केली. यानंतर चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी एक ते दीड मिनिटे संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अश्रू अनावर होत होते. चंदू याने भावनिक होत ‘माझा भारत महान आहे. या देशाच्या लोकांनी व सैन्याने मला दिलेले प्रेम मी विसरु शकणार नाही.’ यावेळी चंदू यांची आत्याबहीण मंगल पाटील यांनीही भारत सरकार व संरक्षण खात्याचे आभार मानत सरकार व सेनेच्या संयुक्त प्रयत्नामुळे आमचा चंदू पुन्हा मायदेशी परतू शकला, असे सांगितले.