लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे दोन वर्ष नोकरभरती न झाल्याने शासकीय भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून द्यावी, या उमेदवारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
विविध कारणांमुळे राज्यात मागील चार वर्षांपासून सरळसेवा भरती रखडलेली आहे, तसेच कोरोनामुळे मागील तीन वर्षात राज्यसेवा परीक्षा एकदाच पार पडली आहे. यामुळे शासकीय सेवेच्या भरतीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. या विद्यार्थ्यांनी इतर राज्यांप्रमाणे वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून दोन वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत.
nराज्य सरकारने पोलिस भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादेत वाढ देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर शासकीय नोकर भरतीसाठीही वयोमर्यादा वाढ उमेदवार मागत आहेत. nकोरोनानंतरच्या शासकीय भरतीसाठी राजस्थानने ४ वर्ष, मध्यप्रदेश व ओडिशाने ३ वर्ष, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, नागालँड, त्रिपुरा या राज्यांनी २ वर्षांची वयोमर्यादा वाढविली आहे.