पुणे : बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुक निकालावरही दिसून येईल. तर पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपची विजयाची परंपरा कायम राहील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर निवडणुकीकरिता भाजपच्यावतीने बुधवारी संग्राम देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पाटील यांच्यासह खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, बिहार निवडणूक निकालाचा सकारात्मक परिणाम पुढील सर्वच निवडणुकावर होईल. राज्यात आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे. मात्र हे सरकार काहीचार वर्षे चालणार नाही, जनता या सरकारला त्रासली आहे तेच सरकार बदलवतील. घटनेच्या बाहेर जाऊन आम्ही काही करणार नाही व हे सरकार पडणार नाही तर ते त्यांच्या अंतर्गत वादातून पडेल. दरम्यान आता निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा १ हजाराचा सर्व्हे केला तर त्यातील ९०० जण भाजपला मतदान करतो असे सांगितले.