ऑनलाइन लोकमत
अभ्यंग स्नान मुहूर्त - पहाटे 05.05 ते 6.34
चतुर्दशी तिथी मुहूर्त - 28 ऑक्टोबर सकाळी 6.20 ते 29 ऑक्टोबर संध्याकाळी 8.40 पर्यंत
मुंबई, दि. 29 - दिवाळीत पहाटे उठून 'अभ्यंगस्नान' केले जाते. शरीराला तेल चोळून, उटणे लावून आंघोळ करण्याची पारंपरिक पद्धत आहे. आयुर्वेदानुसार या 'अभ्यंगस्नाना'चे विशेष महत्त्व आहे. उटणे, सुगंधी तेल या सगळ्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन विशिष्ट वेळेला ते वापरावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. दिवाळीतील अभ्यंगस्नानाने त्वचेसोबतच मनालाही तजेला मिळतो. त्यामुळे अभ्यंगस्नानाचे वेगळेपण जाणून घ्यायलाच हवे.
नरक चतुर्दशी ते बलिप्रतिपदा हे दीपावलीचे तीनही दिवस रोज अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे व नंतर ऊनपाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. नेहमीच्या स्नानाचा प्रभाव सुमारे तीन तास टिकतो तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच तास टिकतो. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते म्हणून तेल लावायचे. ऊनपाणी हे मंगल व शरीराला सुखदायक आहे म्हणून ऊनपाण्याने स्नान सांगितले आहे.
तेल लावून नंतर स्नान करण्याने त्वचेला व केसांना आवश्यक तेवढाच ओशटपणा रहातो; म्हणून स्नानापूर्वी तेल लावणे आवश्यक आहे. स्नानानंतर तेल लावणे उचित नाही. उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहीशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.