मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून अवयवदानाच्या झालेल्या जनजागृतीमुळे अवयवदानात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबपर्यंत ५० व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा आकडा ४२ ते ४५ इतको होता. पण, यंदा आकड्याने ५० चा टप्पा ओलांडल्यामुळे या सकारात्मक बदलाचे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी स्वागत केले आहे. मुलुंड येथे राहणारा एका व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे यकृतदान करण्यात आल्यामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. हे या वर्षातले पन्नासावे अवयवदान आहे. ५२ वर्षीय व्यावसायिक अचानक घरातच चक्कर येऊन पडल्याने तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मेंदू मृतावस्थेत गेला. या परिस्थितीमुळे त्या कुटुंबियांना अवयवदाना विषयी माहिती देण्यात आली. त्यावेळी या पुरुषाचे यकृतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका महिन्यापासून यकृताच्या आजाराने त्रस्त असलेली ४६ वर्षीय महिला प्रतिक्षा यादीत होती. तिला यकृत प्रत्यारोपित करण्यात आल्यामुळे तिला जीवनदान मिळाले आहे. त्याच्या नातेवाईकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला त्या महिलेला जीवनदान देता येणे शक्य झाले. महिलेची प्रकृती स्थिर असून पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला रुग्णालयातच ठेवण्यात येईल असे डॉ. राकेश राय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवयवदानाचे महत्व वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 2:19 AM