मुंबई - देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात. त्या वेळी केंद्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल, अशी भूमिका रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मातोश्री भेटीदरम्यान मांडल्याचे समजते.प्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर दाखल होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीबाबत विविध शक्यता वर्तविण्यात आल्या. भाजपा-शिवसेना युतीसाठी किशोर यांनी ही भेट घेतल्याचे वृत्त देण्यात आले. नव्या माहितीनुसार, काँग्रेस सरकार नको आणि मोदीही नकोत, अशी भूमिका घेत नवी मोट बांधता येईल का, याची चाचपणी मातोश्रीवरील चर्चेदरम्यान करण्यात आल्याचे समजते. प्रशांत किशोर हे रणनीतीकार म्हणून ओळखले जात असले तरी सध्या ते जदयूचे उपाध्यक्षही आहेत. मातोश्री भेटीदरम्यान किशोर यांनी निवडणुकीनंतरच्या शक्यतांची चर्चा केल्याचे समजते. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. त्यात नितीश कुमार पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. ज्यांना काँग्रेसचे सरकार नको आणि मोदींचीही सत्ता नको, अशा पक्षांची जुळवाजुळव शक्य आहे. रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.रालोआमध्ये सहभागी नसलेल्या वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमिती, बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुक यांसारख्या प्रादेशिक पक्षांचे जवळपास शंभर खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. नितीश कुमारांचे नाव पुढे केल्यास हे पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतात. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जदयूच्या उमेदवाराला बिजू जनता दलाने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असू शकते, अशी भूमिका किशोर यांनी मांडल्याचे समजते.अंतिम रणनीती शिवसेनेचीच...शिवसेनेने युतीत सहभागी व्हावे, युतीत आल्यास स्वत: किशोर शिवसेनेला विशेष रणनीती आखून देण्यास मदत करतील, असे वृत्त मातोश्री भेटीनंतर देण्यात आले. मात्र, याला दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला नव्हता. विशेष म्हणजे सर्वेक्षण वगैरे ही शिवसेनेची पद्धत नाही. तळागाळापर्यंत पसरलेले संघटनात्मक जाळे ही शिवसेनेची ताकद आहे. राज्यातील लाखो गटप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘ग्राउंड रिपोर्ट’ देत असतात. पक्षप्रमुखांचा थेट गटप्रमुखांपर्यंत असलेला संपर्क हीच शिवसेनेची ताकद आहे.जनहितासाठी विरोधमोदी-शहा जोडगोळीबाबत विविध पक्षांमध्ये अविश्वासाची भावना आहे. मतदारांमध्येही मोदींनी फसवणूक केल्याची भावना वाढीस लागली आहे. ‘उज्ज्वला’ आणि ‘सौभाग्य’सारख्या योजना केवळ कागदावरच आहेत. शिवसेनेने वारंवार ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. जनहिताच्या बाबींसाठी सरकारविरोधात भूमिका घेण्यास शिवसेना कचरली नाही.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी युती झाली. लालकृष्ण आडवाणींसह नितीन गडकरी यांच्यासारख्या मराठी नावाला शिवसेनेचा आक्षेप असण्याचे कारण नाही, अशी भूमिका शिवसेनेतील सूत्रांनी मांडली.
...तर नितीशकुमार PM?; प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेगळंच गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:24 AM
देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात.
ठळक मुद्देप्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर दाखल होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.