भुर्इंज : डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या भुर्इंज ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभा घेऊन गावात डॉल्बीला बंदी करण्याचा निर्णय घेऊन डॉल्बीचा आवाज बंद केला. विशेष म्हणजे ग्रामसभेला नेहमी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ग्रामस्थ उपस्थित असतात. मात्र, डॉल्बीबंदीसाठी बोलाविण्यात आलेल्या सभेला शेकडो ग्रामस्थांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भुर्इंजमध्ये तीन मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत दररोज याठिकाणी विवाहसोहळे पार पडत असतात. भुर्इंज येथील नाक्यापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या नवरदेवाच्या मिरवणुकीत वाजणाऱ्या डॉल्बीमुळे या मार्गावरील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. विशेषत: लहान मुले, वृद्ध व रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामसभा घेऊन डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्यात आला. सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी डॉल्बी बेकायदा असल्याचे सांगून यापुढे डॉल्बीला गावात अटकाव केला जाईल, असे सांगितले. भुर्इंज ग्रामस्थांच्या संतप्त भावनांची दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यानेच यापुढे गावात डॉल्बी अजिबात वाजू देणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.ग्रामपंचायत सदस्य चंद्रदीप भोसले यांनी या निर्णयास ग्रामस्थांनी जो पाठिंबा दिला तो आनंददायी आहे. त्यामुळेच भुर्इंजसारख्या मोठ्या गावात हा निर्णय झाल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत माधवराव, मदन शिंदे, चंद्रलेखा भोसले, मधुकाका भोसले, शेखर मोरे, विजय गाडे, कृष्णराव जाधव, भाऊसाहेब जाधवराव, अतुल जाधवराव, सुमित सूर्यवंशी, सदाभाऊ रोकडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ दगडे, विजयमाला सूर्यवंशी, संजीवनी दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मंगल कार्यालय मालकांचाही पाठिंबाविशेष म्हणजे लग्नाच्या वरातीसाठी घोडे देणाऱ्या व मंगल कार्यालय मालकांनीही भुर्इंजकरांच्या डॉल्बीबंदीला पाठिंबा दिला आहे. तसेच ज्या लग्नात डॉल्बी नसेल त्यांनाच वरातीसाठी घोडा व मंगल कार्यालय देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तातडीने अंमलबजावणीभुर्इंज गावातील युवा उद्योजक विनित खरे याचा विवाह भुर्इंजमध्ये होणार आहे. या सोहळ्यात आपण डॉल्बी वाजविणार नाही, असे सभेतच जाहीर केले. त्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.
डॉल्बीपेक्षाही वरचढ ठरला ग्रामस्थांचा आव्वाज
By admin | Published: May 19, 2015 10:52 PM