नागपूर: राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकास यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.राज्य चालविण्यासाठी कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो. महसूल जमा करण्याची ही पद्धत 5 हजार वर्षांपूर्वीपासून चालू आहे. कुठलेही काम करण्यासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. कुठलीही परवानगी देताना शासन कायद्यानुसार महसुलाची आकारणी करते. महसूल संबंधीचे कायदे शासनामार्फत करण्यात येतात. हे कायदे लोकांना जाचक वाटू नये, याचा विचार करुन लोकांना काय अडचणी येतात याबाबत विचार होऊन कायदे तयार झाले पाहिजेत. लोकांनी मागणी न करता कायदा होणे अपेक्षित आहे असे पाटील म्हणाले. महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘महाराष्ट्राच्या गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अमूल्य योगदान’ या विषयावर ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, महसूल यंत्रणेतील प्रत्येक घटकाचा नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात संबंध येतो. शासनाच्या योजनांची माहिती, लागणारे विविध दाखले, महसूल यंत्रणेमार्फत दिले जातात. जनतेला विविध योजनांची माहिती, दाखले एकाच ठिकाणी मिळावे यासाठी ‘महाराजस्व अभियान’ महसूल यंत्रणेमार्फत राबविण्यात आले. सातबारा ऑन लाईन देण्यात येत आहे.राज्याच्या विकासात रस्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, यादृष्टीने शेताकडे जाणारे लहान रस्ते, मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत येणारे रस्ते, ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते, राष्ट्रीय महामार्ग या माध्यमातून राज्यात रस्ते विकसित करण्यात येतात. राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे. तसेच रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असते.विविध प्रकल्प निर्माण करताना या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे तसेच आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकरी, नागरिकांना मदत करणे हेही शासनाचे काम असून ते आपत्ती मदत व पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येते. विविध विभागामार्फत शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच विभागाचे राज्याच्या विकासात योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकासाचे महत्त्वाचे योगदान - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 2:39 PM