मुंबई : नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्टार्टअप्ससाठी चांगले व्यावसायिक वातावरण, छोट्या कंपन्यांसाठी उदार कायदे आणि चांगल्या सामाजिक सुरक्षेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला आहे.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, स्टार्टअप्सद्वारे रोजगार निर्मिती आणि स्वरोजगार ही सर्वात मोठी संधी आहे. यासाठी सरकारही कसोशीने प्रयत्न करीत आहे. ही स्पष्ट बाब आहे; परंतु प्रापर्टी राईट प्रोटेक्शन आणि पारदर्शी कर प्रणालीवरही लक्ष देण्याची गरज आहे.राजन यांनी पुन्हा एकदा छोट्या कंपन्यांसाठी सोपा प्रवेश आणि एक्झिट नॉर्म्स बनविण्यावर भर दिला. ते म्हणाले की, अशा कंपन्या सुरू करण्यासोबत त्या बंद करतानाही प्रचंड नियमांचा सामना करीत आहेत. उदार व्यावसायिक वातावरण केवळ आर्थिक प्रगतीच्या नजरेतून महत्त्वाचे आहे असे नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेसाठीही ही बाब महत्त्वपूर्ण आहे. व्यावसायिक वातावरण अनुकूल होण्याने सामाजिक वातावरणालाही मदत मिळते.राजन म्हणाले की, नियम उदार केल्यामुळे जास्तीत जास्त दलित कंपन्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळेल यासाठी त्यांनी एका अहवालाचा उल्लेख केला. त्यात ब्रिटन आणि इटली यांच्यातील स्टार्टअप्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ब्रिटनच्या तुलनेत इटलीत जास्त स्टार्टअप्स कार्यक्रम सुरू होतात; पण जसजसा कल पुढे जातो तसतसे ब्रिटनमधील कंपन्यांची संख्या वाढत जाते. कारण ब्रिटनमध्ये छोट्या कंपन्यांसाठी उदार नियम आहेत, तर ते इटलीत कठोर आहेत.
रोजगारनिर्मिती हाच महत्त्वाचा मुद्दा - राजन
By admin | Published: April 27, 2016 5:00 AM