पुणे - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देशात एनडीए सरकार बनलं. आता भाजपानं मिशन विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पुढील काही महिन्यात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह शनिवारी पुण्यात पोहचले असून याठिकाणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती यावर चर्चा होणार आहे. अमित शाह यांच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील पोहचले होते. या तिन्ही नेत्यांनी शाह यांचे स्वागत केले. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटी आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शाह बैठक घेत पक्षाच्या तयारीवर विचार विनिमय करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र तीन अशी राज्य होती जिथं भाजपाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षफोडीनंतरही भाजपाला चांगलं यश मिळालं नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपानं चांगली कामगिरी केली तर विरोधी मविआला आमदारांच्या बंडखोरीचा फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील याच राजकीय मैदानात केंद्रीय मंत्री अमित शाह पोहचले आहेत. रविवारी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, केंद्र सरकारमधील मंत्री आणि अन्य नेत्यांसोबत शाह यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता नवीन काही समीकरणे, रणनीती आखण्याचा विचार केला जाऊ शकतो.
विधान परिषद निवडणुकीत महायुती वरचढ
अलीकडे विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार उभे केले होते. तर मविआने ३ उमेदवार उतरवले होते. या निवडणुकीत महायुतीच्या सगळ्या ९ जागा विजयी झाल्या ज्यात भाजपाच्या ५ आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २ जागा होत्या. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनं आणि उद्धव ठाकरे गटाने एका जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीत शरद पवारांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांचा पराभव झाला.