Mahayuti PC ( Marathi News ) : महाविकास आघाडीने काल पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात हल्लाबोल केल्यानंतर आता महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून उद्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या दुपारी अडीच वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास काही तास बाकी असताना महायुतीकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आल्याने यातून कोणती मोठी घोषणा करण्यात येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराची घोषणा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात झाली. याचा मोठा फटका लोकसभेवेळी महायुतीला बसला आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारत राज्यात ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू असून मागील काही दिवसांत जागावाटप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याआधीच जागावाटप जाहीर करून मित्रपक्षांतील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून होऊ शकतो.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय होणार?
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर नक्की कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत सस्पेन्स आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष सुरू असताना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून आघाडी घेतली जाते का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्युत्तर
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतून महायुतीवर अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांना उद्याच्या पत्रकार परिषदेतून उत्तर देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
महाविकास आघाडीकडून पुस्तिकेचे प्रकाशन
महायुती सरकारच्या कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. वांद्रे येथील हॅाटेल ताज लँड्स एंडमध्ये मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आदित्य ठाकरे आदीं उपस्थित होते.