मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी तिच्यावर करण्यात येणाऱ्या बेरिअॅट्रिक सर्जरीमध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तब्बल ५०० किलो वजन असणाऱ्या इमानवर शस्त्रक्रियेदरम्यान भूल देणे आव्हानात्मक ठरणार आहे, अशी माहिती बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली.विशेषत: बेरिअॅट्रिक सर्जरीदरम्यान रुग्णाला देण्यात येणाऱ्या भुलीच्या प्रमाणाविषयी अत्यंत दक्षता बाळगावी लागते. त्यात शरीराच्या वजनाच्या क्षमतेप्रमाणे भुलीचे प्रमाण निश्चित केलेले असते. त्यानुसार, एक किलो वजनाला पाच मिलिलीटर भुलीचे प्रमाण असते. त्यानंतर, आवश्यकेतनुसार या प्रमाणात चढ-उतार कारावा लागते, असेही डॉ. बोरुडे यांनी सांगितले.यापूर्वी एका प्रकरणात काही तज्ज्ञ बेरिअॅट्रिक सर्जन्सनी ३०० किलो वजनाच्या रुग्णाला हाताळले होते, ती सर्जरी यशस्वी झाली होती. त्यामुळे अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये भुलीचे प्रमाण ठरविण्यासाठी ३-४ आठवड्यांपासून भूलतज्ज्ञ पूर्वतयारी करीत असतात. त्याचप्रमाणे, इमानच्या वैद्यकीय स्थितीचा प्रत्येक क्षणी अहवाल तपासून याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधी)
भूलतज्ज्ञ बजावणार महत्त्वाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 3:52 AM