जमीर काझी, मुंबईबहुतांश महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वायरलेस, बारनिशी, बंदोबस्त अशी तुलनेत दुय्यम कामे वरिष्ठांकडून दिले जात असल्याचे चित्र आहे. आता मात्र, त्यामध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत. कारण दस्तरखुद्द पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.महिलांना महत्त्वाचे गुन्हे व आर्थिक गुन्ह्यांचे तपास काम देण्याबरोबरच आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या ड्युटी देण्यात याव्यात, त्यासाठी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची सूचना केली असून, त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पोलीस मुख्यालयात सादर करावा लागणार आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात महिला पोलिसांचे प्रमाण अधिक असले, तरी त्यांचे प्रमाण ९ टक्क्यांच्या वर गेलेले नाही आणि महिला अधिकारी व कॉन्स्टेबल यांना केवळ आवश्यक असलेल्या कामाच्या वेळी विशेषत: महिला तक्रारदाराचा जबाब, आरोपीकडे तपास, झडती आदी कामासाठी केला जातो. त्याशिवाय बहुतांश महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना बहुतांश पोलीस ठाण्यात कायम बिनतारी संदेश(वायरलेस), बारनिशी, क्राइमचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम दिले जाते. बहुतांश पोलीस घटकांमध्ये अशी परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर, महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यामध्ये बदल घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व पोलीस आयुक्त/ अधीक्षकांना परिपत्रक काढून सूचना केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे, शाखेमध्ये नेमणुकीला असलेल्या महिला अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या ड्युटी द्याव्यात, त्यामध्ये मोर्चा बंदोबस्त, गुन्ह्याचे तपास ज्यामध्ये महिला विरुद्ध घडणारे गुन्हे त्यांचेकडे तपास कामी देण्यात यावे, तसेच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्याचेकडे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्या बाबतीत घडणारे गुन्हे, तसेच आर्थिक गुन्ह्याचे तपास त्यांच्याकडे देण्यात यावेत, त्यांचेकडून सर्व प्रकारच्या ड्युटी घेण्यात याव्यात व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यात यावे, असे त्यामध्ये नमूद केले आहे. याबाबत प्रत्येक घटकप्रमुखांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाणे व विविध शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, त्याबाबत योग्य कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल पोलीस मुख्यालयात सादर करावयाचा आहे.
महिला पोलिसांनाही मिळणार महत्त्वाचे काम
By admin | Published: February 29, 2016 3:42 AM