प्रज्ञा म्हात्रे, ठाणेरक्षाबंधनानिमित्त यंदा बाजारात रुद्राक्ष राख्यांचा ट्रेण्ड सर्वाधिक आहे. सर्वांनाच वेड लावणाऱ्या ‘पोकेमन गो’ या गेमची छापही यंदाच्या राख्यांच्या बाजारावर पडली असून त्यांची मागणी इतकी आहे, की आतापासूनच त्यांची टंचाई जाणवू लागली आहे. त्यापाठोपाठ क्रेझ आहे ती मिनियन राख्यांची. कुरियर करण्यासाठी सध्या राख्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली असून टपाल कार्यालयापाठोपाठ कुरियर कंपन्यांच्या कार्यालयात त्यासाठी प्रचंड गर्दी होते आहे. राखी पौर्णिमा आठवडाभरावर आल्याने ठाण्यातील बाजारपेठा आकर्षक आणि रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. दुकानांत, बाहेर, रस्त्याच्या कडेला, बाजारपेठांच्या रस्त्यारस्त्यांवर राख्यांची विक्री सुरू आहे. यंदा प्रथमच ‘पावन रुद्राक्ष राखी’ बाजारात आली आहे. १२५ रुपयांना ही राखी मिळते आहे. त्यानंतर ओम, गणपती, स्वस्तिक अशा धार्मिक चिन्हांच्या राख्या डायमण्डमध्ये पाहायला मिळतात. ४०, ५५, ७० असे या राख्यांचे दर आहेत. लाकडापासून बनविलेल्या रुद्राक्षच्या साध्या राख्याही बाजारात आहेत. त्या १० रुपयांना मिळतात. साध्या धाग्यापासून ते अगदी डायमण्डच्या स्वस्तिकच्या राख्या १५ पासून १०० रुपयांपर्यंत आहेत. परदेशात पाठविण्यासाठी एका विशिष्ट पॅकिंगमध्ये राखी बाजारात आली आहे. ५० रुपयांना ती मिळते. बच्चे कंपनींसाठी छोटा भीम, खली, हनुमान, घटोत्कच, बेनटेन, एलियन, अँग्री बर्ड, डोरेमॉन, स्पायडर मॅन, टॉम अॅण्ड जेरी अशा राख्याही आहेत. बेल्ट मिनियन, रबर मिनियन, लायटींग मिनियनही बाजारात असून त्या अनुक्रमे ४०, ३५ आणि २५ रुपये अशा दरांना उपलब्ध आहेत. सॉफ्ट टॉईजच्या किटी आणि टेडी राख्या ३५ रुपयांना आहेत. १सोन्या-चांदीच्या राख्याही बाजारात आल्या असून सोन्याच्या राखीपेक्षा चांदीच्या राख्यांना मागणी अधिक असते, असे सोन्या-चांदीचे व्यापारी कमलेश जैन यांनी सांगितले. २चांदीच्या राख्या २०० रुपयांपासून हजार रूपयांपर्यंत आहेत, तर मिक्स सिल्व्हरच्या राख्या ६० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहेत. कुरिअरने पाठवल्या जाणाऱ्या राख्यांत चांदीच्या राख्यांना अधिक पसंती आहे. ३सोन्याच्या राख्या मात्र ग्राहकांच्या मागणीनुसारच बनविल्या जातात. बजेटनुसार ग्राहक या राख्या खरेदी करतात. बहुतांशी सोन्याच्या राख्या या ब्रेसलेट स्वरुपातच घेतल्या जातात. एक ग्रॅमपासून ते तीन ग्रॅमपर्यंत सोन्याच्या राख्या बनविल्या जातात, असे जैन यांनी सांगितले. ४इटालियन, थायलंड, सिंगापूर येथूनही राख्या आल्या आहेत. त्या हलक्या वजनाच्या आणि फिनिशिंगमध्येही चांगल्या आहेत. कलकत्त्यावरुन फुलांच्या आकारातील या चांदीच्या राख्या आल्या असून त्या आकर्षक आहेत.
राख्यांवरही छाप ‘पोकेमन गो’ची
By admin | Published: August 11, 2016 4:04 AM