पुणे : ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ यांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. शासनाकडून गुंतवणुकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर केली जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात केला.काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिली जाणारी आकडेवारी ही जाहिरातबाजी आहे. या जाहिरातबाजीतून किती रोजगार निर्मिती होणार आहे, याची माहिती राज्य शासनाने जाहीर करायलाहवी, असे ते म्हणाले.सध्या महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत चालली असून गुजरातमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली फडणवीस यांनीमुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र सोडून देवून अहमदाबादमध्ये दिले आहे. हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरणागती पत्करून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. त्याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के असून ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी किमान २०३२ साल उजाडणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. गेल्या तीन वर्षाच्या युती सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यव्सथा डबघाईला आली आहे,असेही चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्राच्या प्रगतीचा सरकारकडून आभास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:10 AM