यवतमाळ/नागपूर/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया व शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्राप्त माहितीनुसार, संदीप बाजोरिया हे एक कोटीची रक्कम घेऊन सोमवारी नागपूरवरून विमानाने मुंबईला गेले. त्यांच्याकडे रोकड असल्याची बाब नागपूर विमानतळावर थोडी उशिराने लक्षात आली. तसे मुंबई विमानतळ प्रशासनाला सूचित करण्यात आले. तेथे बाजोरिया यांची रात्री २ वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी चौकशी केली.एक कोटी रक्कम आपल्या वहीखात्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने प्राप्तिकर अधिका-यांनी सोमवारी रात्रीेच पोलीस बंदोबस्तात त्यांचे बालाजी चौकातील कार्यालय गाठले, परंतु सूर्यास्तानंतर छापा टाकण्याची परवानगी नसल्याने अधिका-यांनी ‘रेकॉर्ड’शी छेडछाड होऊ नये, म्हणून बाजोरिया यांच्या कार्यालयाबाहेर रात्रभर पोलिसांसह पहारा दिला. मंगळवारीसकाळी कागदपत्रांची तपासणी केली. संदीप बाजोरिया यांना ताब्यात घेतल्याचे कळताच त्यांचे भाऊ सुमित बाजोरिया हे मुंबईला गेले होते. छाप्याची माहिती मिळताच मंगळवारी दुपारी १२ वाजता ते यवतमाळात दाखल झाले. अधिका-यांकडून त्यांचीही चौकशी केली जात आहे. छाप्याची कारवाई दिवसभर सुरू होती. बाजोरिया यांच्या बंगल्यातही प्राप्तीकर अधिका-यांनी तपासणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक विजय मुळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित घटनेची माहिती नसल्याचे सांगितले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे बाजोरिया यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले असून, मध्यंतरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनाबाहेर वादावादी झाली होती आणि प्रकरण हातघाईवर आले होते. सिंचन घोटाळ्यात त्यांच्या कंपनीविरोधात जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सर्व काही नियमानुसारसापडलेल्या रकमेची नोंद आहे. बँकेतून रक्कम काढल्याचे पुरावे अधिका-यांना सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे शंकेला कोणताही वाव नाही. सर्व नियमानुसार असल्याचे कंत्राटदार सुमित बाजोरिया यांनी सांगितले.