नाशिक, दि. 15- नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयं आणि कांद्याची खळे येथे गुरुवारी सकाळी इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले होते. इन्कम टॅक्स विभागाच्या या छापेमारीनंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. इन्कम टॅक्स विभागाने नाशिक जिल्ह्यातील सात व्यापाऱ्यांची घरं, कार्यालयांवर छापे मारले होते. या छापेमारीमुळे घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर ३५ टक्क्यांनी घसरले असल्याची माहिती समोर येते आहे. बुधवारी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १४०० रुपये होता. तो दुसऱ्या दिवशी सरासरी ९०० रुपयांपर्यंत पोहोचला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये तर कमाल १३३१ रुपये भाव मिळाला. नाशिकमधील सात कांदा व्यापाऱ्यांच्या घरांवर इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले. त्यांची घरं, कार्यालये आणि गोदामांची तपासणी करण्यात आली. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कमी किंमतीत त्यांच्याकडचा माल विकायला नकार दिला. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पडला.
गुरूवारी इन्कम टॅक्स विभागाने नाशिकमधील सात कांदा व्यापाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. या सातपैकी दोन जण लासलगावमधील आहेत. बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालापैकी तीस टक्के माल विकत घ्यायची क्षमता त्या व्यापाऱ्यांची आहे, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, असंही ते पुढे म्हणाले. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कमी किंमतीत त्यांच्याकडचा माल विकायला नकार दिला. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पडला, असंही त्यांनी सांगितलं. पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाने गुरूवारी कारवाई केली. कांद्याचा साठा करून पैसे कमावल्याच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचं समजतं आहे.