सुनील काकडे/वाशिम : आदिवासी समाजात गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाबाबत प्रभावी जनजागृती झाली आहे. त्यामुळे अमरावती विभागातील २२५ आदिवासी आश्रमशाळांमध्ये पहिली ते बारावीचे तब्बल ७५ हजार ६२0 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या १ लाख १५ हजार असून अकोला जिल्ह्यात १ लाख, वाशिम ७१ हजार, अमरावती ३ लाख ५७ हजार; तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ४ लाख ७३ हजार आदिवासी वास्तव्याला असल्याचे आदिवासी विकास विभागाची आकडेवारी दर्शविते. यात प्रामुख्याने आंध, कोळी महादेव, पारधी ह्या जमातींचा समावेश आहे. अमरावती विभाग अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत चालविल्या जाणार्या १00 शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ हजार ६७१ मुले, १३ हजार ११४ मुली असे एकंदरित २९ हजार ७८५ विद्यार्थी शिक्षण घेत असून विभागातील १२५ अनुदानित आश्रमशाळांमध्ये २८ हजार ६५२ मुले आणि १७ हजार ८७३ मुली अशा ४६ हजार ५२५ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले झाले आहे.
*राज्यात ३.९८ लाखांवर आदिवासी विद्यार्थी
शासकीय आश्रमशाळा समूहअंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर विभागातील ५४७ आश्रमशाळांमध्ये १ लाख ८७ हजार २१६; तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये २ लाख १0 हजार ८७४ असे एकूण ३ लाख ९८ हजार ९0 आदिवासी समाजातील विद्यार्थी राज्यात शिक्षण घेत आहेत. यात नाशिक विभाग आघाडीवर असून या विभागात १ लाख ६८ हजार ९२३ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये शासनाला यश आले आहे.