मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोकळ्या जागांचा विकास करताना त्यातून एसटीची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यावर भर द्यावा. तसेच मंडळाचा सर्वांगीण विकास करण्याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.
मीरा भाईंदर पूर्वेला एसटीच्या मालकीची वीस हजार चौरस मीटर इतकी जागा आहे. त्यातील आठ हजार चौरस मीटर इतकी जागा विकास करण्यासाठी योग्य असून, ती जागा मीरा भाईंदर महापालिकेला देण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली असल्याचे बरगे यांनी सांगितले.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीतील काही जागा राज्य परिवहन विभागाला (आरटीओ) भाड्याने दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या पूर्वीच्या जागा विकसित करताना नियमांची पायमल्ली होऊन बऱ्याच ठिकाणी जागा हडप करण्याचा प्रयत्न झाला असून, अशी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यभरात एसटीकडे ८१२ मोकळ्या जागा असून, त्याचे क्षेत्र १४३३ हेक्टर इतके आहे. एवढी जागा दुसऱ्या कुठल्याही सार्वजनिक उपक्रमाकडे नसून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीकडे एवढाच एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळे याची खबरदारी घ्यावी, असेही बरगे यांनी सांगितले.