पुणे : ई-लर्निंग शालेय साहित्याच्या प्रमाणपत्रासाठी बालभारतीने लागू केलेली ओपन सोर्स संगणक प्रणालीची अट शिक्षण मंत्रालयातून शिथिल करण्यात आली. मंत्रालयामध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला बालभारतीच्या वतीने संचालक चंद्रमणी बोरकर, आय. टी. विभागाचे प्रमुख योगेश लिमये व अॅकॅडमिक विभागाच्या सचिव धनवंती हर्डीकर उपस्थित होते. ई-लर्निंग साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत असे प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, त्यांच्या काही अटी अवाजवी असल्याची तसेच परवानगी शुल्क जादा असल्याची तक्रारही केली.बालभारतीने सर्व कंपन्यांना त्यांचे ई-लर्निंग साहित्य ओपन सोर्स (लायसन्स कॉपी लागत नसलेली कोणतीही संगणक प्रणाली) प्रणालीत सादर करण्यास सांगितले आहे. प्रत्यक्षात बहुसंख्य कंपन्या त्यांचे ई-लर्निंग साहित्य विंडोज अथवा लायसन कॉपीच लागत असलेल्या प्रणालीमध्ये तयार करतात. त्यामुळे कंपन्यांचा बालभारतीच्या या अटीला विरोध आहे.लिमये यांनी बैठकीत सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनांनुसार शैक्षणिक किंवा अन्य कोणतेही सरकारी साहित्य ओपन सोर्स प्रणालीमध्येच असणे बंधनकारक आहे. लायसन असलेल्या संगणक प्रणाली खूप महाग असतात व पालकांना त्याचा विनाकारण भुर्दंड पडतो.कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रधान सचिवांबरोबरच्या बैठकीत या अटीनुसार ई-लर्निंग साहित्य ओपन सोर्स प्रणालीत आणण्यास बराच कालावधी लागेल असे स्पष्ट केले. त्यावर सचिव नंदकुमार यांनी कंपन्यांची व्यावहारिक अडचण लक्षात घेता त्यांनी सध्या प्रमाणपत्रासाठी म्हणून विंडोजमधील साहित्य सादर केले तरी चालेल, मात्र परवानगी मिळाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत त्यांनी त्यांचे सर्व साहित्य ओपन सोर्स प्रणालीत आणावे, अशी सूचना त्यांनी केली. कंपन्यांनी ही अट मान्य केली.
ई-लर्निंग प्रमाणपत्र नियमांत सुधारणा
By admin | Published: August 01, 2015 2:16 AM