मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत. तसेच हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. विरोधकांकडून सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. तर संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने केली असल्याची टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन देशभर उसळलेल्या जनक्षोभानंतर विरोधी पक्षही यावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळे देशभरात याचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. बसपा प्रमुख मायावती, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. तर वेळ पडल्यास रस्तावर उतरण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. तर आता महाराष्ट्रात सुद्धा एमआयएम नागरिकत्व कायद्याचा विरोधात रस्तावर उतरणार आहे.
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या वतीने 20 डिसेंबर ( शुक्रवारी ) नागरिकत्व कायद्याचा विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळावरी खासदार जलील यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली. औरंगाबाद जिल्ह्यात निघणारा मोर्चा सर्वात मोठा असा मोर्चा ठरणार आहे. त्यामुळे संविधानावर विश्वास ठेवणारे आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यात सहभाग घ्यावा. तसेच देशात संविधान बदलण्यासाठी काही लोकं प्रयत्न करत असून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने याची सुरवात केली असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला.
भाजप सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला फक्त मुस्लिमच नाही तर सर्वच समाजातील लोकं विरोध करत असल्याचे जलील म्हणाले. तर हा मोर्चा कोणत्याही एका समाजासाठी नव्हे तर देशावर आलेल्या संकटाच्या विरोधात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांवर अन्याय करणारे कितीही कायदे आणले तरीही त्याला जनता मान्य करणार नसून, त्याला आम्ही विरोध करणारच असेही जलील म्हणाले.