मुंबई - लोकसभा निवडणुकीत युती करून निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील वाद काही संपायचा नाव घेत नाही. वंचित बहुजन आघाडीकडून फक्त आठ जागांची ऑफर असल्याने आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांकडून,जलील हे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे आयकत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना जलील म्हणाले की, असा घाणेरडापणा केला तर लक्षात ठेवा तुमच्यापेक्षा जास्त मी बोलू शकतो. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्द पत्रक काढून केला होता. त्यानंतर वंचितकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. जलील हे खासदार झाल्यामुळे त्यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यानी केला होता. तर खासदार जलील हे पक्षाचे प्रमुख ओवेसी यांचे आदेश पाळत नसल्याचा आरोप सुद्धा वंचीतकडून करण्यात आला होता.
याला उत्तर देताना जलील म्हणाले की, युती होणार नसल्याचे मी पत्रक काढल्यानंतर वंचितचे कुणी पुण्यात तर कुणी अकोल्यात पत्रकार परिषद घेतात. आणि आरोप करतात की जलील आणि ओवेसी यांच्यात मतभेद आहेत. मात्र लक्षात ठेवा, असा घाणेरडापणा केला तर तुम्हाला जेवढ बोलता येते त्यापेक्षा मी जास्त बोलू शकतो. असा इशारा त्यांनी वंचित बहुजन आघाडीला दिला.
माझ्यासाठी असदुद्दीन ओवेसी हे महत्वाचे आहे. त्यांनी सांगितेले तर मी एक मिनटात माझ्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार आहेत. मात्र खोटे बोलून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने करू नयेत. असेही ते म्हणाले.