अकोला - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भातील नवनिर्माण यात्रेची आज सांगता होणार आहे. आज अकोला येथे असणाऱ्या राज ठाकरेंनी दिवंगत जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर राज ठाकरे हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यावेळी एक चिमुरडी हातात बॅनर घेऊन राज ठाकरेंसमोर उभी राहिली.
महिला अत्याचारावरून राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही टीका होत आहे. बदलापूर येथील घटनेनं सर्व पालकांमध्ये चिंता आहे. अकोल्यातही हे दृश्य पाहायला मिळाले. राज ठाकरेंसमोर चिमुरडीने बॅनर पकडून "महाराष्ट्राला गरज आहे राज मामाची, नाही त्या १५०० रु.ची" असा संदेश देण्यात आला होता.
बदलापूरातील प्रकरणाला मनसेनं फोडली वाचा
बदलापूर शहरातील एका शाळेत घडलेलं घृणास्पद प्रकरण मनसेमुळे समोर आलं. त्यावेळी राज ठाकरेंनी संबंधित महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांना सूचना केल्या होत्या. राज ठाकरे म्हणाले होते की, मला तुमचा अभिमान वाटतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. सारखे सारखे लोक येतील त्या मुलीच्या घरच्यांना भेटून छळतील. त्या मुलीला आयुष्यभराचा त्रास देतील. या मुलीचे घर आणि नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. त्या मुलीच्या घरी कुणी जाणार नाही. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पोलीस अधिकाऱ्यांशी बोला. या मुलींसमोर आयुष्य पडलं आहे. बाकीचे कुणी राजकारण करतील परंतु आपल्याकडून ही गोष्ट होता कामा नये. मुलीच्या घरच्यांना आधार द्या. समजावून सांगा. मुलींना त्रास होणार नाही एवढे फक्त बघा..अशा सूचना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
पीडित कुटुंबाने मानले राज ठाकरेंचे आभार
आमच्यावर सध्या मानसिक दबाव खूप जास्त आहे. यातून बाहेर काढण्यासाठी मुलीला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतोय. मुलगी झोपते पण दचकून जागी होते. मला या शाळेत जायचं नाही असं ती म्हणते. आमची मुलगी व्यवस्थित राहावी याला आमचे प्राधान्य आहे. तिचं आयुष्य पुढे आहे. मी राजसाहेब ठाकरेंचा खूप मनापासून आभारी आहे. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आणि आम्हाला मदत केली असं बदलापूरातील पीडित कुटुंबाने म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी मालोकर कुटुंबाची घेतली भेट
अकोल्यात काही दिवसांपूर्वी जय मालोकर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर जयची तब्येत ढासळली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमित ठाकरेंनी तात्काळ अकोल्यात येत मालोकर कुटुंबाचं सांत्वन केले. आज राज ठाकरे विदर्भ दौऱ्यानिमित्त अकोल्यात आले असताना त्यांनी जय मालोकर यांच्या कुटुंबाची भेट घेत विचारपूस केली.